सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी समस्त जिल्हावासीयांची इच्छा होती. गेली काहिवर्षे राजकीय पातळीवर यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. दीपक केसरकर पालकमंत्री असताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला वेग आला होता. महाविकास आघाडीचे सरकार येताच शिवसेनेकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली आणि कोकणच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा ज्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिक्षेत होतं ते मंजूर झाल्याने, जिल्ह्यातील डॉक्टर्सनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांना हॉस्पिटल चे काम लवकर सुरू करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये मुख्यत्वे डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक डॉक्टर उपस्थित होते.
जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होत असल्याने येत्या काही वर्षात नक्कीच जिल्ह्यातील लोकांना उपचारासाठी जिल्ह्या बाहेर धाव घ्यावी लागणार नाही याची खात्री वाटत आहे. लवकरच महाविद्यालय होण्याची दृष्टीने उर्वरित कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा जिल्ह्यातील डॉक्टर्सनी व्यक्त केली.