मालवणात ३० सप्टेंबर रोजी शिवशौर्य यात्रा – भाऊ सामंत
नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन…
मालवण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष व बजरंग दलाच्या स्थापनेचे ४० वे वर्षे या सुवर्णयोगाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कोकण प्रांत यांच्यावतीने ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दोडामार्ग ते शिवाजी पार्क मुंबई अशा शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० रोजी सायंकाळी ५ वाजता शिवशौर्य यात्रा मालवण तालुक्यात दाखल होणार आहे. ढोल ताशांच्या गजरात कुंभारमाठ येथे शिवशौर्य यात्रेचे स्वागत होणार आहे. कुंभारमाठ ते मामा वरेरकर नाट्यगृह मालवण पर्यंत ३५० दुचाकीची रॅली काढण्यात येणार आहे. मामा वरेरकर नाट्यगृह येथे रॅलीची सांगता झाल्यावर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता जाहिर सभा होणार आहे. या भव्य सोहळ्यात तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत यांनी पत्रकार परिषदेत केले.
भरड येथील हॉटेल ओऍसिस येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी मालवण प्रखंड मंत्री सुनिल पोळ, शिवशौर्य यात्रा सिंधुदुर्ग सहसंयोजक संदिप बोडवे, मालवण प्रखंड सत्संग प्रमुख प्रभुदास आजगावकर, मालवण प्रखंड मातृशक्ती प्रमुख वैदही जुवाटकर आदि उपस्थित होते. श्री. सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचे यंदाचे ३५० वर्ष आहे. १९६४ साली श्रीकृष्ण जन्माष्टमीस मुंबईत देशभरातील पूज्य संत, धर्माचार्य आणि दार्शनिकांच्या मंथनातून विश्व हिंदू परिषदेचा जन्म झाला. हिंदू समाजाचे संघटन करत निरंतन कार्यरत असलेल्या विश्व हिंदू परिषदेलाही यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू समाजातील तरूणांना संघटीत करून त्यांच्यामध्ये जागृती आणण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
३० रोजी सकाळी ८ वाजता दोडामार्ग येथून यात्रा निघणार आहे. सायंकाळी ५ वाजता कुंभारमाठ येथे शिवशौर्य यात्रेचे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत होणार आहे. यात्रेनिमित्त मालवणमध्ये शहरामध्ये भगवे ध्वज उभारण्यात येणार आहेत. शहरातील रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गुढ्या उभारून यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. कुंभारमाठ ते मामा वरेरकर नाट्यगृह अशी ३५० दुचाकीची रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसोबत भव्य चित्ररथ देखील असणार आहे. सायंकाळी मामा वरेरकर नाट्यगृह येथे येथे रॅलीची सांगता होणार आहे. ६ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे जाहिर सभा होणार आहे. शिवशौर्य यात्रा स्वागत समितीचे अध्यक्ष डॉ. पंकज दिघे असणार आहेत. या सभेत केंद्रिय बजरंग दलाचे संयोजक डॉ. विवेक कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. या शिवशौर्य यात्रेच्या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री. सामंत यांनी केले आहे.