मडुरा येथील चाकरमानी युवतीचे अल्पशा आजाराने निधन…
बांदा
मडुरा – परबवाडी येथील प्राप्ती शंकर गावडे (२०) या युवतीचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ती आईवडिलांसमवेत गुरुवारी मुंबईहून गावी गणेशोत्सवासाठी आली होती. सकाळी नाश्ता झाल्यानंतर अचानक तिचे डोके दुखू लागले. तिला तातडीने प्रथम खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी तिला मृत घोषित केले. प्राप्ती ही अभ्यासात हुशार व मनमिळावू स्वभावाची होती. पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. गुरुवारी ती मुंबईहून गावी गणेशोत्सवासाठी आली होती. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकी, आजी असा परिवार आहे. मडुरा उपसरपंच कृष्णा उर्फ बाळू गावडे यांची ती पुतणी होय. ऐन गणेशोत्सवात गावडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राप्तीच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.