– पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्गनगरी
कुडाळ तालुक्यामध्ये महामार्गाच्या मोबदल्याच्या सुमारे 23 केसेस प्रलंबित आहेत. त्यांचा प्रश्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मार्गी लावण्यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या आढाव्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकी दरम्यान त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, कोकण विभागाच्या उपायुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, निवडणूक विभागाचे उप जिल्हाधिकारी जयकृष्ण फड यांच्या सह जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. नवले आणि सलिम शेख हे व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. दिनांक 4 डिसेंबर रोजी कुडाळ प्रांत कार्यालयामध्ये एक कॅम्पचे आयोजन करावे अशा सूचना देऊन पालकमंत्री पुढे म्हणाले की, या कॅम्पसाठी ज्या लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यांना निमंत्रण द्यावे. तसेच खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी यांनी उपस्थित रहावे. ठेकेदारासही या कॅम्पसाठी बोलवाले. या सर्व 23 लोकांचे म्हणणे ऐकूण घेऊन जागेवरच तात्काळ त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. जणे करून राष्ट्रीय महामार्गाचे काम व्यवस्थित सुरू होईल. या 23 जणांचे प्रश्न तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे. हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकू नये यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. रस्ता तातडीने पूर्ण व्हावा ही आपली भूमिका आहे. या कॅम्पमध्येच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाला जोडणारे रस्ते, घोडगे – सोनवडे मार्ग ज्या ठिकाणी महामार्गाला जोडणार आहे त्या ठिकाणचा रस्ता व पावशी अंडरपास यासह बस स्टॉप विषयी अंतिम निर्णय घ्यावा अशा सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी केल्या. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी महामार्गात जमिनी गेलेल्या लोकांना मोबदला देण्याचे कामाबाबत तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. तसेच कुडाळ प्रांत यांच्या जागी नवीन अधिकारी नेमावा. लोकांच्या तक्रारी हा गंभीर विषय असून त्याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावेत. ठेकेदाराने काम थांबवले तर त्याची जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची राहिल असे सांगितले. आमदार वैभव नाईक यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली.
जिल्हास्तरिय समितीने दिलेल्या क्लिन चीटचीही चौकशी करा कुडाळ प्रांतांधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरावर अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना क्लिन चीट दिली आहे. या चौकशी समितीने दिलेल्या क्लिन चिटचीही चौकशी करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कोकण विभागाच्या उपायुक्त यांना दिल्या. तसेच महामार्गाच्या मोबदला वाटपाचीही संपूर्ण चौकशी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.