*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांनी लेखिका सौ.राधिका भांडारकर लिखित*
*“ग म भ न” चा पुस्तक परिचय*
*ग म भ न*
लेखिका -सौ राधिका भांडारकर, पुणे
प्रकाशक- शॉपीझेन वेबसाईट
पृष्ठ संख्या १४७
मूल्य ₹ २०२/~
“ग म भ न” हा सौ.राधिका भांडारकर पुणे, यांचा विविध विषयांवरील लेखांचा संग्रह पुस्तक स्वरूपात शॉपीझेन या वेबसाईटवर नुकताच प्रकाशित झाला आहे.
पुस्तक हातात घेताच त्याच्या मुखपृष्ठानेच मला आकृष्ट केले. एक सुंदर शिंपला आणि त्यातून निघालेलली ग म भ न ही अक्षरे.शिंपल्यातले मोतीच जणू.
मनात विचार आला,लेखिकेने या पुस्तकाला ग म भ न असे शिर्शक का बरे दिले असावे? अनुक्रमणिका पहाताच त्यातील सहविसाव्या कथेचे शिर्शक ग म भ न आहे असे लक्षात आले आणि तोच लेख सर्वप्रथम वाचला.
शाळेत पहिले पाऊल टाकल्यापासून ते अगदी तारूण्यात पदार्पण करेपर्यंत शाळेने लेखिकेला काय काय शिकविले आणि पुढे या जगाच्या उघड्या शाळेत आजपर्यंत त्या काय काय शिकल्या आणि शिकत आहेत हे त्यांनी त्यांच्या
साहित्यिक भाषेत वाचकांना सांगितले आहे. त्या म्हणतात,”माझ्या या शाळेत आजही मी शिकतच आहे.प्रवाहपतित,ज्ञानपिपासू. गुरूच्या शोधात असलेली मी आजही गमभन गिरवित आहे.”लेखाच्या या शेवटाकडे आल्यानंतर माझ्या प्रश्नाचे उत्तर मला ताबडतोब मिळाले.
जसजसे एकेक लेख वाचत गेले तेव्हा या पुस्तकरूपी शिंपल्यातून खरोखरच असंख्य मोती वेचल्याचा मला अत्यानंद मिळाला.
वाचकांनाही असाच अनुभव येईल याची मला खात्री आहे.
नामवंत लेखिका/कवियत्री डाॅ.सुमतीताई पवार यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे.त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत जवळ जवळ सगळ्याच लेखांचे विस्तृत विश्लेषण केले असल्यामुळे एकदा का प्रस्तावना वाचली की लेख वाचण्याची उत्कंठा अधिकाधिक वाढतच जाते.
या पुस्तकात एकूण ४३ लेखांचा समावेश असून त्यात सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक, राजकीय असे अनेक विषय अत्यंत सहृदयतेने हाताळल्याचे दिसून येते. पुस्तक म्हणजे मनाचा आरसा असे आपण म्हणतो. प्रत्येक लेखातील एकेका वाक्यातून लेखिका सौ. राधिका भांडारकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू वाचकांना दिसल्याशिवाय राहणार नाहीत, आणि त्यामुळे त्यांच्याविषयी वाचकांच्या मनात आदरभाव निर्माण होईल, आधीपासून असलेला आदर दुणावेल यात शंकाच नाही.
या संग्रहातील पहिलाच लेख * नातं अश्रूंचं*–*” जेथे शब्द संपतात तेथूनच अश्रूंच नातं सुरू होतं” या वाक्याने केलेली लेखाची सुरुवातच आपल्याला आकृष्ट करते. गणूला आलेलं कारभारणीच पत्र उलगडल्यावर लेखिकेने पाहिलेला तो कोरा कागद…. ” डोळ्यातल्या थेंबाने पुसलेली रेष जणू हेच सांगत होती का? तुमची भारी सय येते धनी. ” ही अशी वाक्ये वाचकांनाही भावनिक करतात.
या लेखातील एकेका उदाहरणांवरून लेखिकेचे हळवे, संवेदनक्षम मन प्रदर्शित होते.
*भावनांची रद्दी* या लेखात लेखिकेचे भावनिक मन पुन्हा एकदा दिसून येते. समाजात
वेगवेगळ्या स्तरांवर दिसून येणारी आजची भीषणता पाहून लेखिकेचे मन थिजून गेले आहे, आणि म्हणूनच तिने रफू करून ठेवले आहे.
काही लेख बोधप्रद आहेत. उदाहरणार्थ *शब्दप्रभाव* हा लेख! एकेक शब्द किती प्रभावी असतो, त्याची ताकद किती मोठी असते आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावे हे फार महत्त्वाचे प्रबोधन या लेखातून झाले आहे. राधिका ताईंच्या लेखणीला धार तर आहेच, परंतु त्या धारेने कोणी जखमी होणार नाही, रक्तबंबाळ होणार नाही हे नक्की!
राधिका ताईंचे विचार फार प्रगल्भ आहेत. आधुनिकीकरणाविषयी बोलताना त्या पारंपारिक गोष्टींना कधीच डावलत नाहीत. काहीतरी वेगळं, नवीन करणं म्हणजे आधुनिकता नाही तर ” कुठल्याही परंपरेच्या संकल्पनेचा शोध घेणे, त्यातली भूमिका, कारण आणि काळ याचा अभ्यास करून बदलत्या काळाशी, वातावरणाशी,जीवनपद्धतीशी त्याची सांगड घालून प्रथेचं उचित नूतनीकरण करणे म्हणजे आधुनिकीकरण. ” असे त्या आधुनिक वटपौर्णिमा या लेखात वाचकांना सांगतात.
या संग्रहातील लेख वाचल्यानंतर राधिका ताईंच्या अफाट वाचनाची चांगलीच कल्पना येते. विषय सामाजिक असो, धार्मिक असो, अध्यात्मिक असो, त्याच्या खोलात शिरून त्यांचा सर्वांगाने अभ्यास करण्याची त्यांची जिज्ञासू वृत्ती दिसून आल्याशिवाय राहत नाही.
त्यांनी स्वामी विवेकानंदांचे बंधुत्वाचे, धर्म संकल्पनेचे सर्व विचार तादात्म्य भावनेने समजून घेतले आहेत आणि म्हणूनच त्या म्हणतात, ” अजूनही विश्वातील वर्णद्वेष, धर्म, जात यातून होणारे वाद, कलह, हिंसाचार मिटलेले नाहीतच. वेगवेगळ्या धर्मांची नावे माणसात बंधुभाव निर्माण करण्याऐवजी वैरभाव निर्माण करत आहेत. अशा या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंदांचे धर्म संकल्पनेबद्दलचे भेदक विचार पुन्हा एकदा स्मरणात आणले पाहिजेत. ”
*कालिदास दिनविशेष* हा लेख वाचताना कवी कुलगुरू कालिदासांच्या साहित्याचाही त्यांचा अभ्यास दिसून येतो.
* होशील का लहान* हा लेख वाचताना आपण आपले बाल्य अनुभवीत असल्याचा सतत भास होत राहतो. वाचकांच्या मनाचा ठाव कसा घ्यावा हे राधिका ताई पुरेपूर जाणतात आणि म्हणूनच त्यांचे लहानपण वाचताना त्याच्याशी आपले साधर्म्य असल्याचे जाणवून मन आनंदी होते. आपल्या बाल्याशी त्या जेव्हा आजच्या शाळकरी मुलांची तुलना करतात, तेव्हा मात्र अतिशय वाईट वाटते. पाठीवर मणाचे ओझे घेऊन जाणारी मुले स्कूल बस मध्ये चढतात, शाळा, गृहपाठ, अनेक विषयांचे ट्युशन क्लास, सतत स्पर्धा या सर्वांमुळे पिडलेली आजची मुले आपण पाहतोच आहोत.
* प्रिय पुरुष*.. अत्यंत वाचनीय असा हा लेख! लेखिकेला भाऊ नसल्यामुळे त्या म्हणतात, ” भाऊबीज असो, रक्षाबंधन असो आम्ही पपांनाच ओवाळायचो. त्यामागे एक विचार होता. जो स्त्रीचे रक्षण करतो, तिचा मान ठेवतो, तिच्यातल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगतो आणि शपथ पूर्वक तिची जबाबदारी स्वीकारतो तो पुरुष अशा दिवशी मी माझ्या भावाच्या रूपात पाहते. ” किती उदात्त विचार आहे हा!
बैलपोळा या श्रावण अमावस्येला साजऱ्या होणाऱ्या सणाविषयी त्या आवर्जून लिहितात. वास्तविक भारत हा कृषीप्रधान देश. शेतकऱ्याचे आणि बैलांचे एक विशेष नाते. शेतात राबणाऱ्या बैलांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण.
कौतुक करण्याची बाब ही की इतक्या विविध विषयांवर लिहीत असताना बैलासारख्या मुक्या जनावरावरही लिहिणे त्यांना टाळता आले नाही. माणसांवर प्रेम करत असताना मुक्या जनावरांवरही तितकेच प्रेम केले पाहिजे हा मौलिक संदेश वाचकांना मिळतो.
सर्व ४३ लेखांवर लिहिणे शक्य होणार नाही, परंतु प्रत्येक लेख वाचकांनी वाचावा आणि त्यातील वेळोवेळी वाचनात येणारे विचार
शक्य झाले तर आचरणात आणण्याचा अवश्य प्रयत्न करावा एवढेच जाता जाता सांगावेसे वाटते.
अरुणा मुल्हेरकर
मिशिगन