गणेशचतुर्थीत कोणताही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी काळजी घ्या – अतुल जाधव
वेंगुर्लेत शांतता कमिटीच्या बैठकीत नागरिकांना आवाहन…
वेगुर्ले
गणेश चतुर्थी काळात तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, त्यासाठी नागरिकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी.नियमांचे पालन करून वाहनधारक व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आज येथे शांतता कमिटीच्या बैठकीत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले.गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या माध्यमातून शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
वेंगुर्ले मुख्य बाजारपेठ येथून १७,१८ व १९ सप्टेंबर या कालावधीत रिक्षा , टेम्पो ,लक्झरी आदीसह अवजड वाहनांना बंदी असून पूर्णपणे वाहतूक बंद करण्यात येणार आहे.यावेळी वेंगुर्लेहून कुडाळ अथवा सावंतवाडी येथे जाणारी -येणारी वाहतूक ही वेंगुर्ले पिराचा दर्गा लकी स्टोअर्स कॅम्प मार्गे हॉस्पिटल नाका अशी करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने वेंगुर्ले पोलिस स्थानकामार्फत योग्य पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.बाजारपेठेत गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने खरेदी करताना नागरिकांनी ,रिक्षा , दुचाकीधारक यांनी नगरपरिषद मार्फत नियोजन करण्यात आलेल्या जागेत पार्किंग करावे.नगरपरिषद मार्फत शहरात विविध ठिकाणी पार्किंग बोर्ड लावण्यात आले आहेत,त्याचे पालन करावे.दुकानदार यांनी दक्षता घ्यावी तसेच किराणा माल ,मालवाहतूक गाड्या यांनी शक्यतो १६ सप्टेंबर रोजी ठरवून दिलेल्या वेळेत माल उतरून घ्यावा. मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशी वाहने पार्किंग केल्यास कारवाई करण्यात येईल.वाहतुकीस अडथळा होऊ नये,यादृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही बसवावेत, आक्षेपार्ह घटनेबाबत पोलिसांना कळविण्यात यावे.
यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष विभा खानोलकर , डॉ. श्रीनिवास गावडे, एकनाथ राऊळ ,नेहाल शेख ,जयराम वायंगणकर ,प्रदीप कुबल , ऍंथोनी फर्नाडिस ,राजू पांगम , मुश्ताक शेख , दत्तात्रय शेणई , महेंद्र स्वार ,तुषार शेणई ,चंद्रकांत चोडणकर , अमर नाईक,हर्षल पालव,शोहेब शेख, रिक्षा टेम्पो पदाधिकारी ,वाहतूक पोलिस अंमलदार मनोज परुळेकर, गौरव परब ,सुरेश पाटील, बंडया धुरी आदी उपस्थित होते.