निगडी,प्राधिकरण-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)
बुधवार दि.६ सप्टेंबर २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून “रासलीला” या विषयावर श्रीमती संध्या कोल्हटकर यांचा अध्यात्मिक कार्यक्रम कॅप्टन कदम सभागृह येथे झाला.
लहान थोर, भोगी,योगी या सर्वांनाच प्रिय असणारे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांनी केलेल्या, घडवून आणलेल्या अनेक लीला, आणि त्यापैकीच एक म्हणजे ‘रासलीला’. अश्विनी पौर्णिमेच्या सुमारास खेळली जाणारी कृष्ण व त्याच्या गोपिकांची ही रासलीला अनुकरणीय नसून अनुसरणीय आहे आणि योगमाया म्हणजेच राधेशिवाय ती अपूर्ण आहे. रासक्रीडा अत्यंत पवित्र व वंदनीय असून भक्तिमार्ग दाखवणारी आहे.
श्रीमती संध्या कोल्हटकरांनी आपल्या रसाळ व मधूर वाणीतून खूपच सुंदरतेने व सहजतेने ‘रासलीला’ डोळ्यांसमोर उभी केली. उपस्थित सर्वजणी मंत्रमुग्ध झाल्या होत्या. त्यानंतर छोट्या राधा – कृष्णाच्या हस्ते दहीहंडीचा कार्यक्रम पण आनंदांत साजरा झाला. ‘किती सांगू मी सांगू कुणाला ‘ आणि ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी ‘अशा गाण्यांवर टिपऱ्यांचा ठेका धरत उपस्थित महिलांचा फेरही रंगला. सर्वांना काल्याच्या प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सावरकर मंडळ, महिला विभागाच्या सभासद बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महिला विभागाच्या कार्यकारिणी सदस्या सौ. शुभांगी कवडे यांनी केले.
विभागाच्या कार्यकारिणी सदस्या सौ. उन्नती वैद्य यांनी श्रीमती संध्या कोल्हटकर यांचा परिचय करून दिला. महिला विभागाच्या कार्यकारिणी सदस्य सौ. संपदा पटवर्धन यांनी निवेदने केली. विभागाच्या कार्याध्यक्षा सौ. अश्विनी अनंतपुरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार केला. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभाग, कार्यकारीणी २०२३ च्या सचिव ॲड. सौ. हर्षदा पोरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर यांना विस्तृत वृत्त दिले.