मुंबई (प्रतिनिधी) –
साईबाबा मंडळ परळगावचे सक्रीय कार्यकर्ते व सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी सदाशिव रामचंद्र खोताडे (वय ६७) यांचे दि. २ सप्टेंबर रोजी भायखळा येथील रेल्वे रुग्णालयात अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्यांनी दरवर्षी वाकडी चाळ येथून निघणाऱ्या साईबाबा पालखी सोहळ्याचे आयोजन नीटनेटके करण्यात पुढाकार घेऊन परंपरा कायम राखली होती. वाकडी चाळ तुटल्यानंतर मुलुंड (पूर्व) मुंबई उपनगर येथील एम एम आर डी वसाहतीत साई सेवा सुरळीत पार पाडण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. ते कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी कोणतेही काम कमीपणाचे नसते हे आपल्या कामातून वेळोवेळी दाखवून दिले होते. आपल्या वैयक्तिक जीवनात त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान खऱ्या अर्थाने राबवून आपल्या परिसरात स्वच्छता राखण्यास प्राधान्य दिले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील उधाळे गावचे रहिवासी असलेले सदाशिव खोताडे हे परोपकारी वृत्तीचे आणि लोभसवाणे व्यक्तीमत्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुरेखा, मुलगा सुशील, प्रथमेश, सूनबाई, नातं, पुतण्या, भावजय असा परिवार आहे. त्यांच्यावर ठाणे कोपरी येथे हिंदू स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मंडळी सहभागी झाली होती.