You are currently viewing कोमसाप मालवणच्या “बीज अंकुरे अंकुरे” चे प्रकाशन

कोमसाप मालवणच्या “बीज अंकुरे अंकुरे” चे प्रकाशन

*”केवळ कोकणातच नाही तर सर्व महाराष्ट्रामध्ये असा अभिनव उपक्रम अन्य कोणी केला नसेल,” पद्मश्री मधु मंगेश कर्णिक.*

 

मालवण :

“कोकण मराठी साहित्य परिषद ही संस्था कोकणातील उदयोन्मुख आणि प्रतिथयश साहित्यिकांसाठी स्थापन झाली. लिहित्या हातानी केलेली साहित्य निर्मिती वाचक रसिकांसाठी प्रकाशात आणावी आणि आधीच साहित्यसंपन्न असलेल्या कोकणातील नव्या साहित्य उन्मेषांमुळे या भूमीची सांस्कृतिक संपन्नता वर्धिष्णु व्हावी, हा परिषदेचा मूळ हेतू! श्री सुरेश ठाकूर. (अध्यक्ष, कोमसाप मालवण) यांनी “बीज अंकुरे अंकुरे” या पुस्तकाच्या प्रकाशनातून साध्य केला आहे. हा अक्षर उपक्रम कौतुकास पात्र आहे. ”कोकणातच नव्हे तर सर्व महाराष्ट्रात असा अभिनव उपक्रम अन्य कोणी केला नसेल,” असे गौरवोद्गार पद्मश्री तथा आद्य संस्थापक कोकण मराठी साहित्य परिषद – श्री.मधु मंगेश कर्णिक यांनी कोमसाप मालवणच्या “बीज अंकुरे अंकुरे” या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आभासी शुभेच्छा देताना काढले.

या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे ‘दादासाहेब शिखरे’ सभागृहात शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाला. कोकण सुपुत्र ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त थोर साहित्यिक पूजनीय वि. स. खांडेकर यांच्या पुण्यतिथी दिवशी पुस्तक प्रकाशन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रुजारीओ पिंटो (मालवणी कवी तथा केंद्रीय सदस्य कोमसाप) हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विनायक करंदीकर (कणकवली), रामचंद्र आंगणे (स्वीय सहाय्यक, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य), रविंद्र वराडकर (ज्येष्ठ साहित्यिक), लक्ष्मीकांत खोबरेकर (कार्यवाह नाथ पै सेवांगण मालवण), अशोक कांबळी (अध्यक्ष जेष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे), अनिकेत कोनकर (प्रकाशक सत्त्वश्री प्रकाशन) आणि सुरेश शामराव ठाकूर (संपादक बीज अंकुरे अंकुरे) हे होते.

सुरेश शा. ठाकूर (अध्यक्ष कोमसाप मालवण ) यांनी सदर पुस्तक निर्मितीची कुळकथा सांगितली. कोमसाप मालवणच्या “पेरते व्हा” या नव्या लिहित्या हातांची ही अक्षर निर्मिती आहे, हे सांगितले.

अध्यक्षपदावरून बोलताना श्री. रुजारीओ पिंटो म्हणाले, *”पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत कोमसापच्या ६७ शाखा कार्यरत आहेत. त्यामध्ये ४० लिहित्या हातांना एकत्र करून दोन पुस्तके प्रकाशित करण्याची किमया मालवण शाखेने साध्य केली. ही गोष्ट निश्चितच लक्षवेधक आहे. ४० लिहित्या हातांकडून ४० नवीन पुस्तके नक्कीच प्रकाशित होतील.”* कोमसापच्या कवींचाही एक काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा, त्यात मलाही संधी मिळावी. आणि हे पुस्तक आपण केशवसुतांच्या चरणी अर्पण करावे अशी इच्छा त्यांनी प्रकट केली.

यावेळी निमंत्रित वक्ते डॉ. विनायक करंदीकर यांनी *’वि. स. खांडेकर यांचे जीवनचरित्र आणि कोमसापची वाटचाल’* याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना श्री आंगणे म्हणाले, “सोळा लेखकांची भाषाशैली, विषय व लेखन विविधांगी असल्याने चपखल अशा पद्धतीत लेखन झाले आहे. संपादक सुरेश ठाकूर यांनी आपल्या सोबत आपल्या सदस्यांनाही पुस्तक निर्मितीची जी संधी उपलब्ध करून दिली, ती खरच मार्गदर्शक अशीच आहे.”

श्री खोबरेकर व श्री वराडकर यांनी कोमसाप मालवणच्या सर्व लेखकांचे कौतुक केले. तर पत्रकार श्री अनिकेत कोनकर यांनी लेखनातील तांत्रिक कौशल्यांबाबत उपस्थित सदस्यांना सोदाहरण मार्गदर्शन केले.

यावेळी पूर्वा मनोज खाडीलकर, तेजल गुरुनाथ ताम्हणकर, ऋतुजा राजेंद्र केळकर, आदिती धोंडी मसुरकर, रश्मी रामचंद्र आंगणे, मधुरा महेश माणगावकर, रसिका राजेंद्र तेंडोलकर, दिव्या दीपक परब, वंदना नारायण राणे, देवयानी त्रिंबक आजगावकर, विठ्ठल लक्ष्मण लाकम, वैजयंती विद्याधर,करंदीकर,शिवराज विठ्ठल सावंत, नारायण यशवंत धुरी, सदानंद मनोहर कांबळी या सोळा हातांनी ‘बीज अंकुरे अंकुरे ने’ आपणास काय दिले यावर आपले विचार मांडले.

या पुस्तकाच्या ई – आवृत्तीचे प्रकाशनही यावेळी श्री. रविंद्र वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचा शुभारंभ रश्मी आंगणे यांच्या शारदास्तवनाने करण्यात आला.ऋतुजा केळकर यांनी सर्वांचे स्वागत केले तर आभार दिव्या दीपक परब यांनी मानले. यावेळी कोमसापच्या अक्षर राखी बंधनाचा सोहळा संपन्न झाला. सदर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर (उपाध्यक्ष, कोमसाप मालवण) यांनी केले.

सदर कार्यक्रमाला सुगंधा गुरव, राजेंद्र गोसावी, शर्वरी सावंत, अरुण भोगले, पांडुरंग कोचरेकर, श्रुती गोगटे, मंदार सांबारी , बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, साने गुरुजी वाचन मंदिर मालवण आणि कौटुंबिक सल्ला केंद्र सेवांगण यांचा परिवार तसेच अनेक साहित्य रसिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा