कुटुंबीयांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
माजी मंत्री अनिल परब यांनी वाहली श्रद्धांजली
मुंबई :
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त होते आहे. शिवसेनेचे माजी नेते सुधीर मोरे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. विक्रोळी पार्क साईट परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. त्यांच्या निधनाने एक निष्ठावान शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला आहे असं म्हणत माजी मंत्री अनिल परब यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सुधीर मोरे यांच्या घरच्यांनी त्यांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट न झाल्याने कुर्ला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
रेल्वे रुळावर ३१ ऑगस्टच्या रात्री मोरे यांचा मृतदेह सापडला. गुरुवारी त्यांना एक फोन आला. त्यानंतर मी वैयक्तिक कामासाठी बाहेर चाललो आहे असं त्यांनी त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकाला सांगितलं. त्यांनी त्यांच्या बॉडीगार्डला आपल्या बरोबर नेलं नव्हतं. तसंच गाडी न घेता ते रिक्षाने बाहेर पडले होते. त्यानंतर घाटकोपर आणि विद्याविहारच्या दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर त्यांनी जीव दिला. रात्री साडेअकराच्या सुमारास ते रेल्वे रुळांवर झोपले. लोकल ट्रेनच्या मोटरमनला कुणीतरी ट्रॅकवर झोपल्याचं लक्षात आलं. त्याने वेग कमीही केला होता. मात्र काही उपयोग झाला नाही. लोकल त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या आत्महत्येमागे अनेक धागेदोरे असण्याची शक्यता आहे, ज्याचा पोलीस शोध घेत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सुधीर मोरे यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप केला आहे.