You are currently viewing “इच्छाशक्ती ते ध्येयपूर्ती” गाठणारे शिक्षक श्री गुरुनाथ शंकर पेडणेकर सेवानिवृत्ती निमित्त विशेष लेख

“इच्छाशक्ती ते ध्येयपूर्ती” गाठणारे शिक्षक श्री गुरुनाथ शंकर पेडणेकर सेवानिवृत्ती निमित्त विशेष लेख

 

 

बालपणापासून मुलांवर संस्कार करणाऱ्या आई वडील आणि त्यानंतर मुलांना घडविणारे मूर्तिकार म्हणजेच शिक्षक आणि असेच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणजे श्री गुरुनाथ शंकर पेडणेकर आज आपला ३७ वर्षाचा सेवाकाल पूर्ण करून श्री.गुरुनाथ पेडणेकर हे सेवानिवृत्त होत आहेत. शिक्षक कधीच निवृत्त होत नसतो तर आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतच असतो.. असेच ज्ञानाचे कार्य करणारे हाडाचे शिक्षक म्हणजे पेडणेकर सर…!

 

*”हरी भजनाविण काळ घालवू नको रे*

*अंतरीचा ज्ञानदेवा मालवू नको रे”*

 

असा दिव्य संदेश देणाऱ्या संत श्री.सोहिरोबानाथांवर विश्वास व अढळ श्रद्धा ठेवून कर्तव्य हाच परमेश्वर.. जन्मभूमी कर्मभूमी हीच कर्तव्यभूमी.. जनसेवा हीच ईश्वर सेवा.. शाळा हेच मंदिर..विद्यार्थी हे दैवत.. अध्यापन ही उपासना.. ज्ञानदान हेच श्रेष्ठदान.. विद्यार्थी घडविणे ही पूजा.. अन् विद्यार्थी विकास हेच पुण्यकर्म असे मानून विद्याविकास मंडळ इन्सुली संचालित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली येथून आपल्या ३७ वर्षांची शिक्षक म्हणून सेवा बजावून निवृत्त होणारे श्री.गुरुनाथ शंकर पेडणेकर म्हणजे एक चालते बोलते विद्यालय…! शिक्षकी पेशा ही केवळ नोकरी न समजता शिक्षक म्हणजे समाज घडविणारा दुवा.. ज्ञानदान करणारा सेवक असे मानून कर्तव्य पार पाडणारी आदर्श व्यक्ती..!

शिक्षक म्हणजे शिक्षण क्षमा व कर्तव्य याचा सुरेख संगम..!

विद्यार्थ्यांमधील सूक्ष्म गुणांना वेचून त्यांना एक आदर्श विद्यार्थी घडविणे असे मोलाचे कार्य करणारा कलाकार..!

विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, विश्वास निर्माण करून उत्तम उत्तम काम करण्याची प्रेरणा देत त्यांचा आधार बनणारा आधारवड..!

नवनवे तंत्रज्ञान अवगत करून विद्यार्थ्यांना नव्या युगातील स्पर्धेत उतरवून यशासाठी झपाटून काम करणारा अस्सल दिग्दर्शक..!

इन्सुल येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले इन्सुली येथेच प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षण घेतलेले श्री.गुरुनाथ पेडणेकर पुढे इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालय मध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत झाले. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्यांची आई कै.तारामती, मोठे बंधू श्री.अरविंद व कै.विजय यांनी पेडणेकर सरांच्या शिक्षणाकामी मोलाचे सहकार्य केले आणि समाजात एक शिक्षक म्हणून उभे राहण्याचे बळ दिले. ९ जून १९८६ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली येथे सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर केवळ पोटापाण्यासाठी नोकरी न करता विद्यार्थी घडविण्याकडे त्यांनी जास्त लक्ष दिले. त्यांची दूरदृष्टी, नवनवे प्रयोग करून यश मिळविण्याची इच्छाशक्ती, वेगवेगळ्या कल्पना अमलात आणणे, शिक्षणाची वेगवेगळी क्षेत्रे निवडणे व धडपड या पंचसूत्रीनुसार पेडणेकर सरांनी आपला शिक्षकी प्रवास सुकर केला. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती समजून घेऊन त्यांना आर्थिक पाठबळाबरोबरच विद्यार्थ्यांची हुशारी, कौशल्य पाहून त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात दिशा देण्याचे मोलाचे कार्य केले. मुलांबरोबर केवळ अभ्यासातच नव्हे तर त्यांच्या इतर गुणांमध्ये रमताना त्यांच्याशी समरस होऊन जवळीक साधून मुलांच्या कलाने त्यांना घडविण्यासाठी पेडणेकर सरांनी नेहमीच प्रयत्न केले. शाळेतील कोणताही कार्यक्रम असो त्याचे नियोजन करणे यात त्यांचा हातखंडा. आपल्या कल्पक बुद्धीने सर्व कार्यक्रमाचे योग्य नियोजन करून सुसूत्रता आणत कार्यक्रम यशस्वी करणे यात पेडणेकर सरांचा हात कोणीही धरू शकत नव्हता. स्नेहसंमेलन असो वा शाळेतील कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम, पेडणेकर सरांचा उत्साह नेहमीच ओसंडून वाहत असायचा आणि मग कार्यक्रमाच्या यशस्वीतेत तो दिसून यायचा. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर विशाल, बाहेरील जगाचे ज्ञान देणारे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सामाजिक, व्यवहारिक ज्ञान ज्ञात करून देण्याकडे त्यांचा जास्त कल असायचा. स्काऊट गाईड शिक्षक म्हणून कार्य करताना पाच विद्यार्थ्यांना राष्ट्रपती पदकाचा त्यांनी मान मिळवून दिला होता. यातूनच त्यांची विद्यार्थ्यांकडे पाहण्याची आणि शिक्षक म्हणून समाजाचे ऋण व्यक्त करण्याची सामाजिक वृत्ती दिसून येते.

पेडणेकर सरांची सांघिकवृत्ती संघटनचातुर्य आणि शिक्षणाविषयी असलेली तळमळ, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती यामुळे २००४ साली त्यांच्यावर सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाची अध्यक्षपदाची जबाबदारी श्री. डी.जी. सावंत यांनी सोपवली. तालुक्यातील यशस्वी कामगिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पाच वर्षे उत्कृष्ट कार्य केले. श्री गुरुनाथ पेडणेकर यांचे वडील कै.शंकर कृ. पेडणेकर यांनी शाळेसाठी विनामोबदला जमीन दान दिली होती. त्यांचाच दातृत्वाचा वारसा पुढे चालवत शाळेचा हॉल बांधण्यासाठी पेडणेकर सरांनी मुंबई स्थित ग्रामस्थ मंडळ आणि गावातील दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पालक वर्ग आदींच्या सहकार्याने दिवस-रात्र झटून निधी उभा केला आणि शाळेसाठी सुंदर असा हॉल उभारण्या कामी मोलाची कामगिरी केली. शाळेत विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असायची. शिक्षक म्हणून शालेय कामांना प्रथम प्राधान्य देत त्यांनी सामाजिक, आध्यात्मिक, आणि राजकीय कार्यातही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सामाजिक कार्यात हिरहीरीने भाग घेताना इन्सुलीतील मुंबई स्थित काही सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ज्येष्ठ मंडळी यांच्या सहकार्यातून इन्सुली येथे उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळाची उभारणी करून मंडळाच्या माध्यमातून प्रथम डोबाची शेळ येथे बालवाडी सुरू केली. त्यानंतर रक्तदान शिबिर, पर्यावरण संरक्षण शिबिर, विविध स्पर्धा, व्याख्याने, शैक्षणिक शिबिरे, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर असे अनेक उपक्रम राबवून त्यानी समाजोपयोगी कामे केली. प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा मोलाचा असा सहभाग असतो. इन्सुली येथे डोबाची शेळ एस.टी. बस थांबा उभारणे, संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर त्याचप्रमाणे मंडप, भक्तनिवास आदी उभारण्याकामी निधी संकलनासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. संत सोहिरोबानाथ मंदिरात पार पडणाऱ्या सर्व वार्षिक उत्सवात पेडणेकर सरांचा सहभाग वाखाण्याजोगा असतो.

“सहकार्य यशो बिजम्” हे ओळखून त्यांनी सहकार क्षेत्रात प्रवेश केला. १९८९ साली इन्सुली विविध सहकारी सेवा सोसायटीचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहण्यास सुरुवात केली. सध्या ते सोसायटीचे चेअरमन म्हणून देखील कार्यरत असून २००१ साली इन्सुली ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणूनही त्यांनी काम केले आहे. कै.शिवराम भाऊ जाधव यांच्या प्रेरणेतून सोसायटीची नूतन वास्तू बांधत असताना सोसायटीचा एकही पैसा खर्च न करता निधी गोळा करून भव्य अशी सोसायटीची नूतन इमारत बांधण्यात सरांचा मोलाचा वाटा होता. या कामी त्यांना सुगम उत्कर्ष को. ऑप.सोसायटीचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. सावंतवाडी येथील भंडारी समाज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतपेढीचे प्रवर्तक ते संचालक अशा पदांवर त्यांनी गेली सत्तावीस वर्षे काम पाहिले आहे. सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळाचे देखील ते पदाधिकारी असून समाजाच्या हितासाठी अनेक वर्ष सामाजिक भावनेतून त्यांनी काम केले आहे. सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक ते चेअरमन अशा पदांवर त्यांनी काम करून संघाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करताना स्मरणिका काढून निधी जमविण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले. श्रीदेवी माऊली देवस्थान समितीच्या माध्यमातून मंदिर उभारण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले, त्याचप्रमाणे मंदिरातील दिवाबत्ती खर्चासाठी सरांच्या कल्पनेतून वार्षिक दिनदर्शिका काढून निधी उभारण्यात आला. २०१३ साली गावातील शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे त्यांनी आपला मोर्चा वळविला. इन्सुली सहकारी दुग्ध व्यवसाय सोसायटी स्थापन करून गावातील अनेक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाकडे वळवून सक्षम बनविले. याचा फायदा इन्सुल येथील तब्बल १५० कुटुंबांना झाला आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे मुंबई येथील सुगम उत्कर्ष को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक पदी त्यांची नियुक्ती झाली. ते आजपर्यंत संचालक म्हणून सोसायटीवर कार्यरत आहेत.

राजकारणापेक्षा समाजकार्यावर भर देणाऱ्या पेडणेकर सरांची पुढे जाऊन महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नाम.नारायण राणे यांच्याशी जवळीक झाली. इन्सुली जिल्हापरिषद मतदार संघातून निवडून येत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती म्हणून उत्कृष्ट असे कार्य केले. त्यांच्या कामाची धडाडी पाहता नाम.नारायण राणे यांनी त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर संचालक म्हणून नियुक्ती केली. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. आपला शिक्षकी पेशा सांभाळत असताना त्यांनी मुलांना त्यांच्या व्यवसायात उभे राहण्यासाठी मोलाचे असे सहकार्य करत व्यवसाय उभारणीही सिंहाचा वाटा उचलला आहे.

इन्सुली येथील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे शिक्षक म्हणून पेशा सांभाळत सामाजिक, सहकार, आणि राजकीय क्षेत्राबरोबरच त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणूनही व्यावसायिक पाऊल उचलले आहे. तन, मन, धन अर्पून शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून कार्य करताना दुर्दम्य इच्छाशक्ती चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर कार्यमग्न असणारे एक यशस्वी, गुणी व्यक्तिमत्व म्हणून श्री. गुरुनाथ पेडणेकर सरांकडे पाहिले जाते. शिक्षक म्हणून नेहमीच क्रियाशील, कार्यमग्न असणारे पेडणेकर सर आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. संवाद मीडियाकडून त्यांना भावी आयुष्यासाठी आणि उज्वल भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…!!💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा