शेतकऱ्यांना मिळणारी बोनस रक्कम वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे रुपेश राऊळ यांनी दिले आश्वासन
सावंतवाडी
शासकिय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२०-२१ अंतर्गत भात खरेदी शुभारंभ खरेदी-विक्री संघाचे सभापती श्री.बाबल ठाकूर यांच्या हस्ते सावंतवाडी येथे करण्यात आला. शेतकऱ्यांना मिळणारी बोनस रक्कम वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश यांनी दिले. यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, उपसभापती अरुण गावडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना भात खरेदी-विक्रीबाबत मार्गदर्शन केले. भात खरेदी करीता शासनाने प्रती क्विंटल रु १८६८ एवढा दर जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी भात विक्रीस आणतेवेळी भात पिकाखालील आवश्यक क्षेत्राचा सातबारा, बँकेच्या सेव्हिंग पासबुकची झेरॉक्स, व आधारकार्डची झेरॉक्स प्रत सादर करावी. भात खरेदी ऑनलाईन असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन केल्यानंतरच भातापोटी मिळणारी रक्कम परस्पर बँक खाती होणार आहे. सावंतवाडी तालुक्यासह खरेदी विक्रीमार्फत सावंतवाडी, मळेवाड, मळगाव,.तळवडे, कोलगाव, मडूरा, डेगवे व भेडशी येथे भात खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबल ठाकूर, उपाध्याय अरुण गावडे यांनी केले आहे. गतवर्षी शासनाने प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस दिला होता. यावर्षी शासनाने भात खरेदीच्या दरात ५३ रुपये एवढी अल्प वाढ केली असून बोनस रक्कम वाढ होण्याच्या दृष्टीने योग्यतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी यावेळी दिले.