बापुसाहेब पुतळ्याच्या बाजूला असलेला सिमेंटचा खांब कोसळण्याची शक्यता
पालिकेने तात्काळ लक्ष घालावा; हेल्पलाइन फाऊंडेशन तर्फे राजन आंगणेंची मागणी…
सावंतवाडी
येथील बापुसाहेब पुतळ्याकडे वीज व्यवस्थेसाठी उभा असलेला सिमेंटचा खांब जीर्ण झाला असून तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावा, आवश्यकता असल्यास स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अन्यथा तो खांब पाडून टाकण्यात यावा, अशी मागणी हेल्पलाइन फाऊंडेशनच्या माध्यमातून उद्योजक तथा सदस्य राजन आंगणे व माजी नगरसेवक महेश सुकी, बंड्या नेरुरकर व जीतू पंडीत यांनी केली आहे. नुकतीच श्री. आंगणे यांच्यासह सहकाऱ्यांनी त्या खांबाची पाहणी केली.
याबाबत अधिक माहिती श्री. नेरुरकर यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २३ वर्षापुर्वी एका सामाजिक संस्थेकडुन मोती तलावाच्या परिसरात उजेड व्हावा यासाठी हा सिमेंटचा खांब उभारण्यात आला होता. मात्र तो आता जीर्ण झाला आहे. त्यामुळे तो कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही परिसरात बापुसाहेब महाराजांचा पुतळा आहे तर त्या ठिकाणी छोटे उद्यान असल्यामुळे अनेक नागरिक दुपारी किंवा सायंकाळी सावलीत बसलेले असतात त्यामुळे खांब कोसळल्यास एखादा अपघात होवू शकतो. त्यामुळे याबाबत पालिकेने तात्काळ दखल घ्यावी, आवश्यकता भासल्यास त्या खांबाचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अन्यथा तो धोकादायक आहे. हे लक्षात येते त्यामुळे तो तात्काळ पाडून टाकण्यात यावा त्याच बरोबर परिसरातील उद्यानात पेव्हर ब्लॉक बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.