उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड
सिंधुदुर्गनगरी
भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2021 या अर्हताकारी दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादींचा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली.
एकत्रित प्रारुप मतदार यादी मंगळवार दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या नोटीस बोर्डवर व पदनिर्देशित ठिकाणी लावून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरची अंतिम मतदार यादी दि. 15 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध करणेत येणार आहे.
या मतदार यादीत दावे व हरकती सोमवार दि. 17 नोव्हेंबर 2020 ते मंगळवार दि. 15 डिसेंबर 2020 पर्यन्त स्विकारण्यात येणार आहेत. हे दावे व हरकती स्विकारणेसाठी शनिवार दि. 5 व रविवार दि. 6 डिसेंबर 2020 रोजी तसेच शनिवार दि. 12 व रविवार दि. 13 डिसेंबर 2020 या सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यन्त उपस्थित राहून दावे व हरकती स्विकारणार आहेत. या मोहिमेसाठी जिल्हयातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी सदर विशेष माहिमेसाठी आपले मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (Booth Level Agent) यांची नेमणूक करुन, BLA यांना संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित ठेवावे. या बाबतच्या काही हरकती असल्यास, लेखी स्वरुपात मतदान केंद्रावर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे देण्यात यावे. असे आवाहन उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.