स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागाची चला खेळू या मंगळागौर’ उत्साहात साजरी
निगडी प्राधिकरण-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)
२६ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, महिला विभागातर्फे श्रावण महिन्याचे औचित्य साधून ‘चला खेळू या मंगळागौर’ हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि दणक्यात साजरा झाला. सर्व महिला छान पारंपरिक वेषभूषेमध्ये आल्या होत्या.
फुलांनी सजविलेल्या महादेवाच्या पिंडीची ‘जय देवी मंगळागौरी’ या आरतीने पूजा करून आणि सरस्वती स्तवन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
श्रावणावर आणि पावसावर आधारित गाणी आणि स्व – रचित कविता सादर करून महिलांनी वातावरण निर्मिती तर केलीच पण निसर्गानेही साथ दिली आणि शब्दांच्या श्रावणसरींमध्ये साऱ्याजणी चिंब भिजून गेल्या.
त्यानंतर ‘उखाणे’ स्पर्धा घेण्यात आली. तसेच ‘उत्तम वेशभूषा’ स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही स्पर्धांचे परीक्षक म्हणून ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. वैशाली तळेगावकर यांनी काम पहिले.
त्यानंतर सर्वांच्या आवडीचे मंगळागौरीचे खेळ खेळण्यात आले. या पारंपरिक खेळांमध्ये सर्वजणी मनमुराद रमल्या आणि वय विसरून सहभागी झाल्या. हिरवाईने सजविलेल्या सेल्फी पॉइंटवर सर्वांनी फोटो काढले.
उपस्थितांना श्रावण महिन्यातील सणावारांची व व्रत वैकल्यांची माहिती देण्यात आली. सर्व महिला सभासदांचे हळदी – कुंकू, मसाला दूध आणि फुटाणे देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विभाग सभासद सौ. पल्लवी कोंडेकर यांनी केले. निवेदने तसेच उखाणे स्पर्धांचे काम विभागाच्या कार्यकारिणी सदस्य सौ. संपदा पटवर्धन यांनी पाहिले. परीक्षकांचा यथोचित सत्कार विभागाच्या अध्यक्षा सौ. नेहा साठे यांनी केला. कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.