You are currently viewing मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू…..

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू…..

राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबईः

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश SEBC वर्गासाठी आरक्षित न ठेवता करण्याचा निर्णय घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांना प्रवेश देण्यात आलेले नाहीत, अशा SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुळ्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे प्रवेश मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाच्या अधीन असतील, असा शासन आदेश ठाकरे सरकारने काढला आहे.

सर्वोच्च न्यायालयानं एसईबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली असून, 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या कार्यवाहीबाबत महाधिवक्ता, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या कायदेशीर अभिप्राय विचारात घेतल्यानंतर सर्व प्रवेश सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ही ठाकरे सरकारनं स्पष्ट केले आहे. तसेच हा शासन निर्णय अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहीलं, असंही सरकारनं सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर 2020-21 शैक्षणिक वर्षातील 9 सप्टेंबर 2020 नंतरची सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया एसईबीसी वर्गाकरिता आरक्षण न ठेवता पार पाडण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी 9 सप्टेंबर 2020 पूर्वी एईसीबी प्रवर्गातून प्रवेशाकरिता अर्जे केले असतील, परंतु त्यांना प्रवेश देण्यात आले नसतील अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार असल्याचंही ठाकरे सरकारनं सांगितलं आहे.

दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आता मराठा क्रांती मोर्चाकडून मशाल रथयात्रा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद ते मुंबईतील आझाद मैदान अशी ही रथयात्रा असेल. येत्या 28 तारखेला ही मशाल रथयात्रा औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने कूच करेल. कोपर्डी आणि शिवनेरी किल्ल्याच्या मार्गाने ही रथयात्रा मार्गक्रमण करेल, असे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा