जत्रोत्सव पुन्हा येईल, जीवन एकदाच मिळेल….
संपादकीय…….
कोरोनाचे संकट अजून संपलेलं नसून कोरोनाची दुसरी लाट वेगाने येत आहे, त्यामुळे सरकारने सुद्धा सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत परराज्यातील ये-जा विना तपासणी बंद करून टेस्ट करूनच राज्यात प्रवेश देण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या पौर्णिमेपासून कोकणात गावागावात मोठ्या उत्साहाने होणाऱ्या जत्रोत्सवांवर मात्र विरजण पडले आहे. परंतु जत्रोत्सव पुन्हा येईल जीवन एकदाच मिळेल याची जाण ठेवत काही गावांनी आपल्यातील समजूतदारपणाचे दर्शन घडवत जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे जाहीर केले आहे.
मातोंड गावचे जागृत देवस्थान असलेली श्री देवी सातेरी चा जत्रोत्सव येत्या २९ नोव्हेंबर २०२० रोजी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा जत्रोत्सव पारंपरिक पद्धतीने, धार्मिक विधी करत साधाच करण्याचे ग्रामस्थ, देवस्थान कमिटी यांनी ठरविले आहे. जत्रोत्सवातील गर्दी टाळण्याकरिता लोटांगणाचा कार्यक्रम देखील रद्द करत देवमेळ्यात ठरल्याप्रमाणे घरीच तुळशीला प्रदक्षिणा घालत उपवासाची सांगता करण्याचे सूचित केले आहे.
मातोंड-पेंडुर येथे १८ डिसेंबर २०२० रोजी होणारा प्रसिद्ध व जागृत श्री देव घोडेमुखाचा जत्रोत्सव देखील गर्दी टाळण्यासाठी रद्द करण्यात आलेला असून भाविकांनी आपले नवस (कोंबडा व इतर) फेडण्याकरिता मंदिरात येऊ नये नवस फेडले जाणार नाहीत असे आवाहन केले आहे. तसेच देवमेळ्यात ठरल्याप्रमाणे आपले नवस घराकडूनच फेडण्यात यावेत त्यासाठीची परवानगी गावकरी व देवस्थान कमिटी यांजकडून देण्यात आलेली आहे. भाविकांनी सहकार्य करावे असे मातोंड व पेंडुर ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटीने आवाहन केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात आपल्या इच्छा, आवडी यांना आवर घालत, हजारो भाविकांची श्रद्धा असलेले गावचे वार्षिक उत्सव देखील पारंपरिक, साध्या पद्धतीने करण्याचे जाहीर करून मातोंड-पेंडुर ग्रामस्थांनी लोकांपुढे आदर्श घालून दिला आहे. गावकऱ्यांचा हा समजूतदारपणा नक्कीच कोरोनाला गावच्या सीमारेषा ओलांडण्यास मज्जाव करेल यात तिळमात्र शंका शंका नाही. ग्रामदैवत श्री देवी सातेरी आणि श्री देव घोडेमुख कोरोनाचा नायनाट करो, पुढचा जत्रोत्सव उत्साहात होवो अशीच आज प्रत्येक ग्रामस्थांनी आणि भाविकांनी देवापुढे प्रार्थना केली असेल.