सातार्डाचे सुपुत्र रोहित रेडकर यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव..!
सावंतवाडी :
तालुक्यातील सातार्डा गावाचे सुपुत्र रोहित रवींद्रनाथ रेडकर यांनी गोवा राज्याच्या विद्यापीठामध्ये विज्ञान शाखेच्या पदवीका (एम. एस. सी ) परीक्षेत गणित विषयात गोवा राज्यात 90.44 टक्के गुण प्राप्त करून नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल पी . एस. श्रीधरन पिल्लई, गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरीलाल मेनन व मान्यवर उपस्थित होते. गोवा विद्यापीठाचा पदवीदान सोहळा नुकताच संपन्न झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते वीस विद्यार्ध्यांना पदवी, पदवीका आणि पदके बहाल करण्यात आली. त्यामध्ये सातार्डा गावचे सुपुत्र कु. रोहित रेडकर याला विज्ञान शाखेच्या पदवीत्तर पदवी परीक्षेत गणित विषयात गोवा राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने राष्ट्रपती मुर्मू यांच्याहस्ते सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले.कु. रोहित रेडकरला राष्ट्रपतींच्याहस्ते गौरविण्यात आल्याने कौतुक केले जात आहे.