कणकवली :
मुंबईसह कोकण किनारपट्टी विभागामध्ये सुमारे 75 विधानसभा मतदार संघ असून येथे मच्छीमार बांधवांना प्रतिनिधित्व मिळत नसल्याने आता किमान 2 मतदारसंघ राखीव ठेवण्यात यावेत अशी मागणी गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर हे निवडणूक आयोगाकडे करणार आहेत.
गेली अनेक वर्षे मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारी करणाऱ्या गाबीत समाज, भंडारी, कोळी, इतर समाज आणि मुस्लिम, ख्रिश्चन समाजातील लोकांचे अनेक प्रश्न विधानसभा, विधान परिषदेत विविध पक्षांच्या आमदारांनी मांडले. कांही वेळा त्यावर दोन्ही सभागृहात चर्चा झाल्या. परंतु अजूनही मच्छीमारांचे अनेक प्राथमिक प्रश्न सुटू शकलेले नाहीत. त्यासाठी मच्छीमार बांधवा मधून किमान 2 ते 3 आमदार विधानसभेत जाणे आवश्यक आहे. म्हणून कोकणातील विधानसभा मतदारसंघ मच्छीमार समाजासाठी राखीव ठेवणे आवश्यक झाले आहे. म्हणून मुंबईसह कोकणातील मतदार संघांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्गात वेंगुर्ले, मालवण व देवगड हा स्वतंत्र मतदारसंघ करून तो मच्छीमार प्रतिनिधीसाठी राखीव असावा. शेतकरी, बागायतदार व इतर यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी दुसरा दोडामार्ग – सावंतवाडी व कुडाळ – कणकवली – वैभववाडी तिसरा मतदार संघ व्हावा. तसेच रत्नागिरी जिल्हयात रत्नागिरी – गुहागर व दापोली या मतदारसंघातून एक मतदारसंघ मच्छीमार बांधवांसाठी राखीव असावा. शिवाय रायगड, ठाणे व मुंबई किनारा विभागातून एक मतदार संघ मच्छीमार बांधवांसाठी राखीव असावा.
कोकण किनारपट्टी वरील मच्छीमारी करणाऱ्या समाज बांधवांचे राहत्या घरांचे प्रश्न, जमिनी नावे करणे, व्यावसायिक जागांचे परवाने, जातीच्या दाखल्यासाठी न मिळणारे महसुली पुरावे, नोकरीत न मिळणारे आरक्षण, सीआर झेड कायद्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, रस्ते, पायवाटा, समुद्र, खाडी यामुळे नैसर्गिक आपत्तीचे प्रश्न, पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न, महिला मच्छीमार व्यावसायिकांचे प्रश्न, डिझेल परतावा, जाळ्यांचे नुकसान, मुलांना नोकऱ्या न मिळणे, धूप प्रतिबंधक बंधारे बांधणे, पर्यटन व्यावसायिकांचे परवाने, दाखले, बांधकामे व मंजुरीचे प्रश्न,कोळी वाड्यांचे प्रश्न व पुनर्वसन असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी मच्छीमारांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळणे हि काळाची गरज आहे.
या जिल्ह्यात अशा मच्छीमार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय मच्छीमार कृति समिती, संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा मच्छीमार संस्था फेडरेशन, महिला मच्छीमारांना महिला मच्छीमार सहकारी संस्था, रापण सहकारी संस्था, पर्यटन संस्था अशा विभागवार संस्था आणि तालुका व जिल्हा समाज संस्था कार्यरत आहेत. तरीही गेली अनेक वर्षे मच्छीमारांचे अनेक प्रश्न मांडले गेले नाहीत किंबहुना त्यावर निर्णय झालेले नाहीत. त्यामुळे मच्छीमारांचे प्रश्न धसास लावण्यासाठी पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जाती साठी राखीव मतदार संघाप्रमाने मुंबईसह कोकणात किमान 2 ते 3 मतदारसंघ मच्छीमार प्रतिनिधी म्हणून राखीव असावेत अशी मागणी श्री.चंद्रशेखर उपरकर यांनी केली आहे.