*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्य*
*घननिळा श्रावण*
मन बेभान जाहले
घननिळ्या श्रावणात
मन चिंब चिंब न्हाले
ओलावले पावसात !१!
नभ दाटले ढगांनी
गरजले कानोकानी
मनसोक्त बरसले
रानीवनी पानोपानी !२!
रानमळा बहरला
पाना पानात फुलला
ऊन पावसाचा खेळ
माझ्या मनात रंगला !३!
डोंगराचे वाहे पाणी
खडकांच्या कपारीत
खळखळे वाजे कानी
जणू तान्हुले कुशीत ! ४!
चारा हिरवा चरती
गाई गुरे हंबरती
घुंगराचे नाद स्वर
साज संगीत भासती !५!
मोर लांडोर प्रणयी
नृत्य बेधुंद करिती
अलौकिक सौंदर्याने
डोळे पारणे फेडिती !६!
पूजा नि व्रतवैकल्य
सणवार दिस मोठे
राखी बांधण्या भावास
लेक माहेरास गाठे !७!
©【दीपि】
दीपक पटेकर, सावंतवाडी