– हरी खोबरेकर
शिवसेना आमदार, खासदार निधीतून ८६ लाख तर जिल्हा वार्षिक योजनेतुन १५ कोटी ५८ लाख रु सिंधुदुर्गात कोविड उपाययोजनेवर खर्च
कोविड १९ उपाययोजनेसाठी आरोग्य यंत्रणेला राज्यात सर्वप्रथम कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी २५ लाख रु चा निधी दिला आहे. आमदार स्थानिक विकास निधीतून राज्यात सर्वप्रथम निधी देणारे ते एकमेव आमदार आहेत.२८ मार्च २०२० रोजी आमदार वैभव नाईक यांनी हा निधी आरोग्य यंत्रणेसाठी दिला आहे ३१ मार्च २०२० रोजी या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून हा निधी जिल्हा नियोजन मार्फत आरोग्य यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे आ. वैभव नाईक यांनी २०२०- २०२१ मध्ये आमदार स्थानिक विकास निधी मधून १० लाखाचा निधी जिल्हा आरोग्य विभागासाठी जी. प. कडे दि. १७ जुलै २०२० रोजी दिला आहे. आ. नितेश राणे यांनी वैयक्तीय स्वार्थ जोपासून सर्वात शेवटी कोरोना संपत आल्यावर निधी देऊन आपलेच तुणतुणे वाजवत आहेत. आ.वैभव नाईक यांनी निधी दिला तेव्हा ते मुंबईत बसून ट्विटरवर टिव्ह टिव्ह करत होते.कदाचित त्यामुळेच त्यांना निधीची माहिती नसावी. शिवसेना आमदारांनी दिलेल्या निधीची माहिती न घेता नितेश राणे यांनी आपले अज्ञान जनतेसमोर प्रकट केले आहे. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे आमदार नितेश राणे यांनी आपलेच तुणतुणे वाजवू नये. सिंधुदुर्गची जनता सूज्ञ आहे. खोटे बोला पण रेटून बोला ही वृत्ती राणेंनी आता बंद करावी अशी टीका शिवसेना मालवण तालुकाप्रमुख तथा जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे सावंतवाडी मतदारसंघाचे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी २०१९-२० आमदार स्थानिक विकास निधीमधून आरोग्य यंत्रणेसाठी एकूण ४८ लाख रु निधी दिला आहे. त्याचबरॊबर खासदार विनायक राऊत यांनी खासदार स्थानिक विकास निधी २०१९- २० अंतर्गत ३ लाखाचा निधी दिला आहे. असा एकूण ८६ लाखाचा निधी आ. वैभव नाईक, आ.दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांनी आरोग्य यंत्रणेसाठी दिला आहे.
त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेतुन कोविड १९ उपाययोजनेसाठी सन २०१९-२० मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, उपजिल्हारुग्णालयात ग्रामीण रुग्णालयांसाठी ७ कोटी ७५ लाख ४५ हजार रु देण्यात आले.त्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यासाठी ७५ लाख १९ हजार देण्यात आले आहेत. व २०२०- २१ साठी जिल्हा वार्षिक योजनेतुन ७ कोटी ८३ लाख ७१ हजार रु देण्यात आले आहेत. याअंतर्गत १ कोटी २३ लाख रु आरटीपीसिआर लॅबसाठी, ७२ लाख रु ऑक्सिजन प्लांटसाठी ,१ कोटी ३६ लाख रु मधून व्हेंटिलेटरवर घेण्यात आले , तसेच मल्टिपॅरा मॉनिटर, इन्फ्युजन पंप, कोरोना टेस्टिंग किट, ऑक्सिजन सिलेंडर किट, औषध पुरवठा, थर्मामीटर, ऑक्सिमीटर, पीपीई किट, एन ९५ मास्क, ट्रिपल लेअर मास्क,सॅनिटायझर, आदींसाठी हा निधी खर्च करण्यात आला आहे. असे एकूण १५ कोटी ५८ लाख ६३ हजार जिल्हा वार्षिक योजनेतुन कोविड १९ उपाययोजनेसाठी देण्यात आले आहेत.
राज्य सरकार मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. तसेच ट्रुनेट व सीबीनेट मशीन देण्यात आले. फॉवलर मेट्रेस बेड साठी १ लाख ९९ हजार रु देण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून आक्सिजन कन्सन्ट्रेशन ची ४ उपकरणे देण्यात आली. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मध्ये कोविड१९ साठी १ कोटी ७१ लाख १० हजार रु जिल्ह्यासाठी उपल्बध झाले त्यातील आजरोजी पर्यंत १ कोटी ५३ लाख ७८ हजार रु खर्च करण्यात आले यातील १२ लाख ४९ हजार ५०० रु अँटीजेन टेस्टसाठी देण्यात आले. तसेच एक्रोलिक सीट, कोविड रुग्नांना जेवण, कोविड सेंटर उपाययोजना , कॉरंटाईन सेंटर उपाययोजना, इतर जिल्हा, परराज्यातील मजुरांसाठी कॅम्प, कोविड रुग्नांना नेण्यासाठी गाड्यांची व्यवस्था, यासाठी खर्च करण्यात आले आहेत.
कोकणचे स्वयंघोषीत भाग्यविधाते समजणारे खा. नारायण राणे यांनी २०१९-२० व २०२०-२१ मध्ये आपल्या खासदार निधीतून एक नवा रुपया देखील जिल्ह्याला कोविडसाठी दिलेला नाही. जर राणेंना सिंधुदुर्गच्या जनतेची एवढी काळजी असती तर कोविडसाठी निधी का दिला नाही हे त्यांनी जनतेसमोर जाहीर करावे. शिवसेना पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत आ. वैभव नाईक, आ.दीपक केसरकर यांनी जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार जिल्हयात वेगवेगळ्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. आ. वैभव नाईक यांनी ना.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून १ ऍम्ब्युलन्स देखील जिल्हयासाठी उपलब्ध केली आहे. तसेच पाठपुरावा करून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यात आली.तसेच रिक्षा व्यावसायिक, दशावतारी कलाकार, सलून व्यावसायिक गरीब गरजू व्यक्ती इतर ठिकाणी नोकरी शिक्षणानिमित्त्त अडकलेल्या जिल्ह्यातील लोकांना धान्य वाटप, तसेच आर्थिक स्वरूपात देखील मदत शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली. त्यामुळे नितेश राणेंनी दिलेल्या तुटपुंजा निधीचा गाजावाजा करू नये व शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेला उपलब्ध झालेल्या निधीची माहिती घेऊन अभ्यास पूर्वक टीका करावी असा सल्ला हरी खोबरेकर यांनी नितेश राणेंना दिला आहे.