उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे ग्राहक पंचायतची मागणी.
वैभववाडी
ग्राहकांच्या वीज बिल तक्रारींचे निरसन करण्याच्या उद्देशाने दिनांक २४ व २५ नोव्हेंबर या कालावधीत वैभववाडी तालुक्यातील सहा गावांमध्ये ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहक मेळाव्यामध्ये ग्राहकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात यावे, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्संग जिल्हा आणि वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी वैभववाडी यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.
वीज ही सर्वच ग्राहकांची मुलभूत गरज आणि हक्क आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून वीज बिले मासिक येत असून दरही वाढलेले आहेत. वाढीव आणि भरमसाठ वीज बिलाने सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडलेले आहे. त्यामध्ये मार्च २०२० पासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वीज बिले भरमसाठ आलेली आहेत येत आहेत. या वाढीव आणि भरमसाठ वीज बिलाबाबत सर्वत्र असंतोष पसरलेला आहे.अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनी वैभववाडी यांच्यावतीने ग्राहकांच्या वीज बिल तक्रारींचे निरसन करण्याच्या उद्देशाने दिनांक २४ व २५ नोव्हेंबर,२०२० या कालावधीत सहा गावांमध्ये ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी बातमी वर्तमानपत्रामध्ये वाचण्यात आली. आपण आयोजित केलेल्या विज बिल तक्रारींचे निरसन करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या ग्राहक मेळाव्यामध्ये वीज ग्राहक आणि वीज वितरण कंपनी यांच्यासोबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि वैभववाडी तालुका शाखेच्या प्रतिनिधींना या मेळाव्यात सहभागी करुन घ्यावे अशी विनंती आम्ही या निवेदनाव्दारे आपणाकडे करीत आहोत.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे भूतपूर्व मंत्रिस्तरीय अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शक तत्त्वांवर कार्यरत असलेली “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” ही संस्था ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य करीत आहे. मागील दहा वर्षात महाराष्ट्रातील अनेक जिल्हे व तालुक्यांमध्ये विस्तारलेली ही चळवळ निरलस, निरपेक्ष व समाज शरणवृत्तीने कार्यरत असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून धरली आहे. ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, ग्राहकांच्या अडचणीवर मार्गदर्शन आणि प्रशासनाला सहकार्य करीत शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्यकर्ते जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्य करीत आहेत.
आम्ही केलेल्या या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार होऊन योग्य कार्यवाही करावी अशी विनंती जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य व पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील व वैभववाडी तालुका शाखा संघटक श्री. शंकर स्वामी यांनी मेलव्दारे केली आहे.