*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित वास्तववादी काव्यरचना*
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला या रविवारी म्हणजे २० ऑगस्टला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. मारेकरी पकडले असले तरी सूत्रधार मोकाटच आहेत. मात्र चळवळ अधिक वेगाने व जोमाने पुढे जात आहे ही दिलासादायक गोष्ट आहे. डॉक्टरांना अभिवादन करून मी या निमित्त व्यक्त होत आहे.
*डॉक्टर तुमच्या नंतर*
———————————
वृत्त लवंगलता
दिनी आजच्या नभी बुडाला लखलखणारा तारा
ओघळलेले रक्त पाहुनी स्तब्ध जाहला वारा
युगायुगाच्या अंधारावर प्राणपणाने धडके
मनुवाद्यांचा भय धक्याने चढवत गेले पारा
मुहूर्त,मंगळ,शकुन, अपशकुन खोट्या साऱ्या बाता
अंधाराचा किती चढवला डोक्यावरती भारा
देवी येते,करणी करते प्रश्न खरे चल शोधू
मानसगुंता हा तर आहे अज्ञानाचा सारा
भोंदू बाबा, तांत्रिक मांत्रिक गर्दी सारी झाली
कलम, कायदा आधाराने त्यांस दाविली कारा
कसोटीवरी तर्कसंगती घासुन पाही सारे
अंधश्रद्धांच्या ठेल्यांचे मग पार वाजले बारा
प्रबोधनाने कुणाकुणाच्या हितास आली बाधा
घाबरून मग देत राहती ‘ धर्म बुडाला ‘ नारा
पुष्कळ दिडक्या मिळवित होते डॉक्टरकीची कामे
सर्व सोडूनी वेचित गेले कष्टाच्या या गारा
डॉक्टर तुमच्या नंतरही ती मशाल नाही विझली
इथे विवेकी विज्ञानाची पहा धावते धारा
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
@सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
17.08.2023