You are currently viewing कलासंपन्न हिरवाईचे देवदूत ना. धों. महानोर

कलासंपन्न हिरवाईचे देवदूत ना. धों. महानोर

*✍️ॲड.रूपेश पवार, पत्रकार, ठाणे*

 

मराठी मातीचा कृषीतुल्य महाकवी ना. धों. महानोर रानातल्या कविता गाता गाता स्वर्गलोकीच्या वन प्रवासाला निघून गेले. त्यांची प्राणज्योत गुरुवारी तीन ऑगस्ट २०२३ रोजी मालवली. रानातील कवितांचा हिरवा बहर आता नव्याने आपल्याला अनुभवता येणार नाही. त्यांनी लिहून ठेवलेल्या कवितांचा आस्वाद मात्र या विश्वाला कायम घेता येईल. असा अनमोल ठेवा महानोर यांनी साहित्यप्रेमींसाठी जतन करून ठेवला आहे. त्यातूनच पुढच्या पिढीला रानातील हिरव्या कविता, फुलांच्या वेगवेगळ्या रंगछटा, पक्षांचा आनंदी किलबिलाट त्याचबरोबर गावागावातील शेतकऱ्यांचे जीवन, त्यांच्या वाट्याला येणारे दुःख, ग्रामीण आयाबायांचे रोजचे प्रश्न, त्यांच्या वेदना, संवेदना त्यातूनही उमटणारा त्यांचा शृंगार हे सर्व सर्व प्रत्येक साहित्य रसिकाला अनुभवता येणार आहे. या सगळ्यातून माणसाची माणूस होण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू होईल. कारण आजचा काळ तंत्रशुद्ध जागतिकीकरणाचा आहे. त्यात कितीही चकचकीत सुबत्ता आली, तरीदेखील या समाजाचा उदरभरणाचा प्रश्न, महानोर यांच्या मातीतून सुटणार आहे. म्हणून कवी ना. धों. महानोर यांना हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.

अशा या कवीवर्य ना. धों. महानोर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ साली, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मधल्या, पळसखेड या गावी झाला. तिथेच त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. नंतर त्यांनी जळगावत येऊन महाविद्यालयीन शिक्षणाकरता प्रवेश घेतला पण त्यांना हे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षातच सोडावे लागले. मग त्यांनी घरच्या परिस्थितीमुळे पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. छोट्याशा शेतातून त्यांनी सुरुवात केली आणि आपला शेती उद्योग वाढवत नेला. महानोर यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केले. त्यातूनच पुढे ना. धों. महानोर शेतीतज्ञ म्हणून नावारूपाला आले. त्यांच्या या कृषी मार्गदर्शनामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे आमदार केले. जवळजवळ बारा वर्षे त्यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे निभावली. त्या काळात महानोर यांनी परिपूर्ण शेती जीवनासाठी उल्लेखनीय कार्य करत, शेती संबंधीचे वेगवेगळे प्रश्न सोडवले. शेतीच्या धोरणात्मक कार्यात त्यांनी पुढाकार घेऊन, वस्तूस्थिती दाखवून दिली. त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांनी कायम महानोर यांच्या शब्दाला मान देत, शेती क्षेत्राच्या विकासाकरता त्यांच्या सूचना व हरकतींना महत्वाचे स्थान दिले. अशाप्रकारे ना. धों. महानोरांचे कार्यकर्तृत्व होते. त्यामुळे महानोरांचा लोकसंग्रह मोठा होता. याचमुळे महानोर यांनी लोक मनाचा कोनोसा घेत विविधांगी लेखन केले.

म्हणून महानोर कवी, गीतकार, कथा, कादंबरीकार शेती प्रबंधक होते. यामुळे त्यांचे लेखन साहित्य सर्वच बाबतीत समृद्ध होते. महानोर यांनी १९६७ ला ‘रानातल्या कविता’, १९७० ला ‘वही’, १९८० ला पावसाळी कविता या नंतर दर पाच, सहा वर्षाने ‘अजिंठा’ (दीर्घ कविता), ‘प्रार्थना दयाघना’, ‘पक्ष्यांचे लक्ष थवे’, ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘गाथा शिवरायांची’, ‘जगाला प्रेम अर्पावे’, ‘गंगा वाहू दे निर्मळ’, २०१३ ला ‘वाटूळ’, हे काव्यसंग्रह आहेत. ‘पळसखेडची गाणी’ (लोककवितांचे संपादन), ‘पुन्हा कविता’, ‘पुन्हा एकदा कविता’, ‘बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ‘निवडक कविता’ हे संपादनसंग्रह, त्याच बरोबर कथा, कादंबरी, ललित आणि शेती विषयातील लेखन अशी ही महानोर यांची विपुल साहित्य संपदा आहे.

शेती, सामाजिक कार्य, काव्य, साहित्य आदी लेखन क्षेत्रात कार्य मग्न असताना. ना. धों. महानोर यांनी मराठी चित्रपट गीतांचे लेखनही केले. चित्रपट दिग्दर्शक, निर्माते जब्बार पटेल यांनी महानोर यांना १९७८ साली ‘जैत रे जैत’ चित्रपटासाठी निमंत्रित केले. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर या दोघांनी ना. धों. महानोर यांना आग्रहाने बोलावून घेतले. त्यावेळी महानोर गीत लेखनासाठी तयार नव्हते. गीत लेखन ही एक अवघड गोष्ट आहे, असे त्यांना मनोमन वाटत होते, तरीदेखील हृदयनाथजींनी महानोर यांना प्रोत्साहित करून त्यांच्या हातून जोमदार गीत रचना करून घेतल्या. ‘नभ उतरू आलं’, ‘मी लाज टाकली’, ‘आम्ही ठाकर ठाकर’ अशा प्रकारची आजरामर गाणी महानोर यांनी केली. ती गाणी पुऱ्या महाराष्ट्रात गाजू लागली. त्यातून महानोर यांचा गीतकार म्हणून नवा जन्म झाला. यानंतर त्यांच्या कविता, त्यांची गाणी मराठी माणसाच्या सहज ओठावर येऊ लागली. मग त्यांनी या क्षेत्रातही मागे वळून पाहिले नाही. पुढे रमेश देव यांच्या ‘सर्जा’ या ऐतिहासिक चित्रपटाची गाणी ना. धो. महानोर यांच्याकडे आली. त्या गाण्यांना सुद्धा लोकप्रियता मिळाली. या लोकप्रियतेमुळे महानोर यांनी पुढील काळात चित्रपटासाठी अनेक गाणी लिहिली.

त्या चित्रपटामध्ये ‘एक होता विदूषक’, ‘अबोली’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘अजिंठा’, ‘यशवंतराव चव्हाण’ या सुप्रसिद्ध चित्रपट कलाकृतींचा समावेश आहे.

अमोल शेडगे दिग्दर्शित ‘अबोली’ हा चित्रपट १९९४ -९५ च्या काळात खुप गाजला होता. त्याचप्रमाणे नितीन देसाई दिग्दर्शित अजिंठा हा चित्रपट ना. धों महानोरांच्या संकल्पनेतूनच साकारला होता. कारण महानोर संभाजीनगरात वास्तव्य करत असल्यामुळे, अजिंठा लेण्यांचा इतिहास त्यांनी जवळून अनुभवला होता. ‘अजिंठा’ वर त्यांचा दिर्घकाव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. म्हणून महानोर या चित्रपटातचे गीतकार आहेत. दिग्दर्शक, जब्बार पटेल यांच्या ‘मुक्ता’ चित्रपटाचे कथानक एका कवीच्या मुली भवती फिरते. त्यामुळे स्वाभाविकच जब्बार यांना ना. धों. महानोर हवे होते. यातली गीतं गावरान निसर्गावर आधारित होती. विक्रम गोखले हे कवीच्या भूमिकेत होते. ‘जाई जुईचा गंध मातीला’, ‘वळणवाटातल्या झाडीत हिर्वे छंद’ अशी चार-पाच गाणी या चित्रपटातून आपल्याला ऐकायला मिळाली त्याचबरोबर ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट तमाशगीर स्त्रिच्या जीवनावर होता. मधु कांबीकर, लक्ष्मीकांत बेर्डे या दोन कलाकारांनी यात मध्यवर्ती भूमिका केली होती. ह्या कथानकाचे पटकथाकार होते पु. ल. देशपांडे, यांच्या कथेला महानोर यांनी आपल्या गीतातून फुलवले. निसर्गातील उपमा, अलंकारांना लावणीच्या शृंगारात घालून, सुंदर शब्दरचनेचा अविष्कार ना. धों. महानोर यांनी लावण्यांमध्ये आणला. त्याचबरोबर महानोरांनी अंगाई, नमन, भावगीत अशी गीतेही त्यात लिहिली. ‘भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग’, ‘भर तारुण्याचा मळा’ ही महानोर यांची गाणी आजही ऐकायला आवडतात. म्हणून या लोककवीला अनेक पुरस्कार प्रप्त झाले. १९९९ मध्ये भारत सरकारने त्यांना पदद्मश्री हा सन्मान बहाल केला.

असा हा ना. धों. महानोर यांचा प्रतिभासंपन्न, कल्पक, विचारदर्शी जीवनपट पाहिल्यावर असे म्हणावेसे वाटते. हा कृषी कर्मयोगी समाजाच्या सर्व स्तरात जाऊन, अतिशय नम्रपणे आपले कार्यकर्तृत्व जनतेसमोर ठेवत असे. त्यातून त्यांनी साहित्य, कला, शेती प्रबोधनाच्या माध्यमातून वाचक प्रेक्षक आणि शेतकऱ्यांचे मन ओळखले. म्हणून ते या सर्व कामात तरबेज राहिले. समाजाच्या तळागाळापर्यंत पोचलेले हे हिरवाईचे देवदूत होते. शासनाने ना. धों. महानोर यांच्या पळसखेड गावामध्ये त्यांच्या जीवन कार्याचे स्मारक करावे. कारण महानोर शेतकरी, साहित्यिक, प्रबोधक आमदार होते. एक मॅट्रिक झालेला साधा माणूस सामान्य आयुष्य जगताना, किती मोठा होऊ शकतो. याचे उदाहरण पुढच्या पिढीला देणे आवश्यक आहे. आज आपण शेतकरी जीवनात निराशा पाहतो. ती निराशा झटकून टाकायची असेल, तर त्याकरता हे स्मारक होणे गरजेचे आहे. शासनाने ना. धों. महानोर यांच्या आमदारकीच्या काळातील त्यांची विधान परिषदेची भाषणे मुद्रित व व्हिडिओ स्वरूपात प्रसिद्ध करावीत. महानोर आपल्या साहित्यातून, चित्रपट गीतातून आपल्यासमोर कायमच राहतील आणि अनेक कवी महानोरी कविता नव्या रूपात घेऊन येतील. एक महाकवी आपल्यातून जातो पण तेचे महाकाव्य अमर राहून अनेकांना दिशा देते. महानोर यांचे काव्य अशा प्रकारचे आहे.

 

अँड. रुपेश पवार

9930852165

प्रतिक्रिया व्यक्त करा