वसई (गुरुदत्त वाकदेकर) :
दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वतंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे वसईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात आयुक्त अनिल कुमार, आमदार क्षितीज ठाकूर, प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. सदर सन्मान मंडळाचे अध्यक्ष निलेश भानुशे, योगेश भानुशे, डॉ. राहुल भंडारकर, राहुल पाटील, वीरेंद्र यादव, जिग्नेश जगताप यांनी स्वीकारला.
गणेशोत्सव मंडळ वसईचा राजा १९५७ साली देव, देश आणि धर्म सेवेसाठी स्थापित करण्यात आले. मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या मूल्य तत्त्वांवर झाली. सन १९९९ पासून नव तरुणांनी या उत्सवाची सूत्रे हाती घेतली आणि त्याचे रूपांतर गणेशोत्सव मंडळातून सामाजिक सांस्कृतिक संस्थेत केले. तेव्हापासून ते आजतागायत वसईचा राजा उत्सव मंडळाने आरोग्य, शिक्षण, स्वच्छता या सामाजिक कार्याच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला आहे. महिला कल्याण, सर्व विभागांचा आर्थिक विकास, कोविड काळात मानवतेची सेवा सुरू करणारी ही पहिलीच संस्था ठरली होती. वसईकरांचा अभिमान असलेल्या ह्या मंडळाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजातील विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.