*सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांना व संघटनेत काम करू इच्छीणाऱ्या नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन*
सावंतवाडी :
जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व व्यापारी महासंघ या संस्थांना संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्ह्यात कार्यरत आहे.
पावसाळा सुरू झाल्या पासून वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रकार दैनंदिन घडत आहेत. काही भागातील नागरिकांना आठ-आठ दिवस वीजेविना काळोखात घालवावे लागत आहे. वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या दर्जाहीन सेवेचा नाहक त्रास होत असताना वीज दरात मात्र भरमसाठ वाढ केली जात आहे. अशा सावंतवाडी तालुक्यातील वीजेबाबत विविध समस्या सोडविण्या संदर्भात पुढिल रूप रेषा ठरविण्यासाठी व सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची स्थापना करण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची सावंतवाडी तालुका बैठक शनिवार दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 4.00 वाजता नगरपरिषदेच्या इंदिरा गांधीं व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाच्या शेजारील हाॅलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे आणि एकमताने निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व आठही तालुक्यातील वीजे संदर्भातील समस्या समजून घेणे तसेच या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी तालुका कार्यकारिणी गठीत करणे, तालुक्यातील विविध भागातील वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ठोस भूमिका घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वीज समस्यां सोडविणे व वीज ग्राहकांना न्याय देणे हा या संघटनेचा हेतू असल्याने वीजेबाबत तक्रार असलेले नागरिक, संघटनेचे पदाधिकारी तसेच वीज ग्राहक संघटनेच्या तालुका व जिल्हा कार्यकारीणीत काम करु इच्छिणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांनी या बैठकीला उपस्थित राहून सहकार्य करावे. असे अवाहन वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, उपाध्यक्ष ॲड.नितीन म्हापणकर, सचिव निखिल नाईक व समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.