*दिग्गज साहित्यिक कै.जयवंत दळवी जयंती निमित्त….”जयवंत दळवींच्या सहवासात”*
*आजगाव साहित्य प्रेरणा कट्ट्याचा ३४ वा मासिक कार्यक्रम साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या घरी संपन्न*
१४ ऑगस्ट म्हणजे महान साहित्यिक कै.जयवंत दळवी यांचा जन्मदिवस…! जयवंत दळवी यांच्या जयंतीच्या निमित्ताने साहित्य प्रेरणा कट्टा, आजगाव आणि श्री.सचिन दळवी व कुटुंबीय आदींच्या सहकार्याने जयवंत दळवी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला काल १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०० वाजता *”जयवंत दळवींच्या सहवासात”* या विषयांतर्गत खुद्द जयवंत दळवींचा ज्या वास्तूमध्ये वास होता त्याच दळवींच्या घरात जिल्हाभरातील नव्हे तर मुंबई, गोवा येथीलही जयवंत दळवी प्रेमी साहित्यिक यांच्या उपस्थितीत एक आगळावेगळा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक श्री.विनय सौदागर आणि जयवंत दळवी यांचे पुतणे श्री.सचिन दळवी यांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर नाट्य कलावंत आणि व्यावसायिक श्री.प्रसाद रेगे, सोबत कोमसाप कुडाळ तालुकाध्यक्ष श्री.आनंद वैद्य, आनंदयात्री संस्थेच्या अध्यक्षा सौ.वृंदा कांबळी, श्री सुधाकर ठाकूर, श्री.रघुवीर उर्फ भाई मंत्री आदी उपस्थित होते.
साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या नित्य नियमावली प्रमाणे जयवंत दळवी यांच्या घरी सुरू झालेला कार्यक्रम सायंकाळी ठीक ४.०५ ते ६.०५ वाजेपर्यंत सुरू होता. “जयवंत दळवींच्या सहवासात” या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम श्री.रवी पणशीकर यांच्या सुश्राव्य गणेशस्तवनाने झाली. आपल्या प्रास्ताविकात ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे यांनी जयवंत दळवी यांच्या आरवली, शिरोडा बाजारपेठ येथील अनेक आठवणींना उजाळा दिला. जयवंत दळवी गावी असताना वापरत असलेला पेहराव, हातात पिशव्या घेऊन शिरोडाच्या बाजारात नित्यनेमाने जाणे आणि जाता येताना ज्या ज्या गोष्टी दृष्टीस पडत त्यावर वास्तववादी लिखाण करणे आदीबाबत श्री.अनिल निखार्गे यांनी सविस्तर माहिती दिली आणि जया काकांच्या आठवणी जागृत केल्या. कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे आनंदयात्री संस्थेच्या अध्यक्षा सौ. वृंदा कांबळी यांनी जयवंत दळवी यांच्या कादंबरी, नाटक, कथा लेखन इत्यादी बाबत सविस्तर माहिती देत जयवंत दळवी यांचे अजरामर असलेल्या लेखन सर्वांच्या नजरेसमोर हुबेहूब उभे केले. जयवंत दळवी यांच्या साहित्याबाबत बोलताना त्यांच्या पुस्तकातील कादंबरीतील विविध घटना किस्से वृंदा कांबळी यांनी खुलवून सांगितले आणि जयवंत दळवी हे व्यक्तिमत्व कसे होते हे दाखवून दिले. जयवंत दळवी यांच्या लिखाणात आवर्जून येणारा “वेडा” या विषयावर देखील त्यांनी प्रकाशझोत टाकला. जयवंत दळवी यांची विपुल साहित्य संपदा आहे. यात कादंबरी, नाटक, विनोदी, संपादकीय, प्रवासवर्णन, लघुकथा तसेच
प्रसिद्ध साहित्यकृती – ‘सारे प्रवासी घडीचे’ यांचा समावेश तर होतोच शिवाय त्यांनी काही चित्रपट कथा / पटकथा देखील लिहिल्या आहेत. यात
उत्तरायण (२००५ – ’दुर्गी’वर आधारित), चक्र (१९८१), रावसाहेब (१९८६), कच्चा लिंबू (२०१७)(‘ऋणानुबंध’कादंबरीवर आधारित ) अशा काही चित्रपटांचा समावेश आहे.
आजचा कार्यक्रम हा “जयवंत दळवी यांच्या सहवासात” या विषयावर असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेल्या इतर साहित्यिकांबाबत देखील अनेकांनी आपले विचार प्रकट केले. यात प्रामुख्याने शिरोडा येथील महाविद्यालयीन युवती कु.सृष्टी नारिंगणेकर हिने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा जीवन प्रवास आणि त्यांची साहित्य निर्मिती याबद्दल सखोल अभ्यासपूर्ण माहिती दिली. आजगाव साहित्य प्रेरणा कट्ट्याचे सदस्य लेखक श्री. सुधाकर ठाकूर यांनी चिं. त्रं. खानोलकर म्हणजे आरती प्रभू यांच्या कवितांचे वाचन तसेच रसग्रहण केले आणि वेंगुर्ला तालुक्यातील बागलाची राई, तेंडोली येथील चिंतामणी त्र्यंबक खानोलकर म्हणजेच “आरती प्रभू” यांच्या कोंडूरा माळावरील आठवणींना उजाळा दिला. मला गवसलेले मधुभाई या विषयावर बोलताना कु. सिद्धी ठाकूर हिने मधुभाईंचा म्हणजेच पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा संपूर्ण जीवन प्रवास त्यांच्या सत्तरच्या आसपास असलेल्या कादंबऱ्या आदी विपुल लेखनावर सखोल अभ्यासपूर्ण असे विवेचन केले. मधुभाईंच्या साहित्यातून तिला समजलेले, गवसलेले मधु मंगेश कर्णिक सिद्धी ठाकूर हिने श्रोत्यांच्या समोर अक्षरशः उभे केले. तिच्या या अभ्यासपूर्ण सादरीकरणाचे सर्वांनी टाळ्यांनी अभिनंदन केले. साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक श्री. विनय सौदागर यांनी विष्णू सखाराम खांडेकर (वि. स. खांडेकर) म्हणजेच पूर्वाश्रमीचे गणेश आत्माराम खांडेकर यांचा जीवन प्रवास आणि त्यांचे लेखन, साहित्य, साहित्यिक प्रवास उलगडून सांगितला. गणेश आत्माराम खांडेकर यांनी आपला फर्ग्युसन कॉलेजमधील शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी आपले काका सखाराम खांडेकर यांच्याकडे दत्तक गेल्याने त्यांचे नाव विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वि. स. खांडेकर झाले याची आठवण करून दिली. परंतु नंतरच्या काळात सरकारने “खेड्याकडे चला” असा नारा दिल्याने वि. स. खांडेकर जिल्ह्यातील कुठल्याही शहरात न राहता शिरोडा या गावी येऊन स्थायिक झाले. त्याचप्रमाणे शिरोडामध्ये बावडेकर विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाल्याची आणि त्याना मिळालेल्या “ज्ञानपीठ” पुरस्काराची देखील आठवण करून देत, ज्ञानपीठ कदाचित याच पाणंदीत मिळणारं होते असे म्हणत जयवंत दळवी व वि.स.खांडेकर हे सख्खे शेजारी होते हे ज्ञात करून दिले. वि. स. खांडेकर हे शिरोड्यामध्ये येताना आपल्या सोबत फक्त तीन गोष्टी घेऊन आले होते त्या म्हणजे दुबळे शरीर, अधुदृष्टी, आणि अनिश्चितता… परंतु शिरोड्यात आल्यानंतर अनिश्चितता दूर झाली आणि दुबळे शरीर व अधु दृष्टि या दोन गोष्टी मात्र मरेपर्यंत त्यांच्या सोबत होत्या, अशीही आठवण श्री.विनय सौदागर यांनी सांगितले. शिरोडा येथूनच वि. स. खांडेकर यांची १४ पुस्तके प्रकाशित झाल्याचेही ते पुढे म्हणाले.
आभार प्रदर्शन करताना श्री.सचिन दळवी यांनी आपले काका जयवंत दळवी यांच्या आठवणी विशद करताना त्यांना सर्वात जास्त आवडत असणाऱ्या माश्यांबाबत मजेशीर गोष्टी सांगितल्या. जया काकांना माशांची सर्वात जास्त आवडत होती ती माशांची डोकी ठेचून त्यात आले, लसूण, आंबट, तिखट घालून कळकुटी बनवली जायची याची. माशांमध्ये सर्वात जास्त त्यांना आवडायचा तो गोबरा मासा… मिश्किलपणे बोलताना जयवंत दळवी गोब्रा माशाची तुलना इंग्रज माणसाची करायचे. गोब्रा हा मासा तांबूस तपकिरी रंगाचा असतो. तो इंग्रज माणसांसारखा लालेलाल दिसतो अशी त्यांची कल्पना असायची. मासे खाणे त्यांना एवढे आवडत होते की, ज्यावेळी ते आजारी होते त्यावेळी शेवटच्या क्षणी ते म्हणायचे की *”मला दहन करू नका तर समुद्रात सोडा एवढी वर्षे मी मासे खाल्ले आता माझे मला खातील”*. शिरोडा एस.टी. स्टँड समोरील पिंपळाखाली पूर्वी कोल्हापूर बेळगाव येथून खटारी गाडीवाले माल घेऊन विक्रीसाठी घेऊन यायचे आणि तिथे मुक्काम ठोकायचे. त्यावेळी दुपारचे ते पिंपळाखालील पारावार बसून ताटात भात आणि वर लालबुंद माशाची आमटी घालून जेवायचे. जयवंत दळवी हे पाहून म्हणायचे “मला सुद्धा हे त्यांच्या ताटातील जेवण पाहून इथेच जेवावेसे वाटते, परंतु मी घरी जाण्या अगोदर मी इथे जेवल्याची खबर घरी पोहोचेल आणि मग मात्र माझी खैर नाही”. अशा कोणाला ज्ञात नसणाऱ्या दळवींच्या भावूक आठवणी जयवंत दळवी यांचे पुतणे श्री.सचिन दळवी यांनी विशद केल्या.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्री.विनय सौदागर लिखित “मायकू” काव्यसंग्रहाचे श्री प्रसाद रेगे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जपानी भाषेतील हायकूचे मालवणी भाषेत मायको असे नामकरण श्री.विनय सौदागर यांनी करत अतिशय भावस्पर्शी असे १७ अक्षरांचे ५/७/५ अशी मांडणी असलेले मायकू लिहिले आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी गोवा येथून आलेले साहित्य संगम गोवाचे सचिव श्री.मांद्रेकर, अध्यक्ष श्री.शेटगावकर श्री.रघुवीर उर्फ भाई मंत्री, श्री. शरद परुळेकर, शाम नाडकर्णी, श्री.अनंत वैद्य, श्री.प्रकाश रेगे इत्यादींनी आपले विचार प्रकट केले. आरवली येथील श्री.संकेत यरागी नवकवी गझलकाराने स्वलिखित गजलेतील काही मतले सादर केले. या कार्यक्रमासाठी खास मुंबई येथून प्रसिद्ध गायक संगीतकार मंदार आपटे व शास्त्रीय गायिका सौ.स्वाती आपटे उपस्थित होत्या. “जयवंत दळवींच्या सहवासात” या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून अनेक नामवंत साहित्यिक, रसिक श्रोते आणि जयवंत दळवी प्रेमी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने श्री.विनय सौदागर श्री.रवी पणशीकर, श्री.रघुवीर उर्फ भाई मंत्री श्री. सचिन दळवी व कुटुंबीय, श्री.सुधाकर ठाकूर, सौ.वृंदा कांबळी, श्री. प्रसाद रेगे, श्री.आनंद वैद्य, श्री.श्याम नाडकर्णी, श्री शरद परुळेकर, ज्येष्ठ पत्रकार श्री.अनिल निखार्गे, सौ. सुनंदा परुळेकर, श्री.दीपक पटेकर, प्रा.रुपेश पाटील, श्री.मंदार आपटे, स्वाती आपटे, श्री.मांद्रेकर, श्री सुभाष शेटगावकर, संकेत एरागी, सौ छाया नारिंगणेकर, कु.सृष्टी नारिंगणेकर, कु.सिद्धी ठाकूर, श्री.सोमा गावडे, धोंडी नारींगणेकर, श्री.सचिन दळवी व परिवार आणि साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते. महान साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या घरात कार्यक्रम होत असल्याने जिल्हा व जिल्हा बाहेरील दळवी प्रेमी साहित्यिकांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अनिल निखार्गे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.जयवंत दळवी यांचे पुतणे श्री.सचिन दळवी व सूत्रसंचालन साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक श्री.विनय सौदागर यांनी केले.