सामाजिक – सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांची प्रमुख उपस्थिती!
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचाही होणार गौरव!
कणकवली
बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानचा शिक्षक गौरव सोहळा शनिवार 19 रोजी सकाळी ११ वा. बावशी गावठण येथे आयोजित करण्यात आला आहे.प्रसिद्ध सामाजिक – सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांच्या प्रमुख उपस्थिती होणाऱ्या या सोहळ्यात गावातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष विलास कांडर आणि कार्यवाह समीर मयेकर यांनी दिली.
बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानची बैठक या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बावशी येथे घेण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मोहन खडपे, कोषाध्यक्ष शिवराम गुरव, सहकार्यवाह संजय राणे, सदस्य नारायण मरये, भरत कांडर आदी उपस्थित होते.
विकासापासून दुर्लक्षित राहिलेला बावशी गाव. या गावाची शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय उत्तम व्हावी म्हणून ग्रामस्थांतर्फे शिक्षकांना प्रेरणा देणे गरजेचे आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असल्याने या शिक्षक गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार बावशी शाळेतील मुख्याध्यापक विनोद ठाकूर, सहायक शिक्षक दिनेश पाटील आणि अंगणवाडी कर्मचारी स्वप्नरेखा एकनाथ कांडर, नर्मदा नामदेव मरये, राजश्री शिवराम गुरव यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीला कार्यक्रमाला निमंत्रित करावे असा एक मुखी निर्णय घेण्यात आल्यानंतर या क्षेत्रातील मधुकर मातोंडकर यांना कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर भविष्यात मुलांना सांस्कृतिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मोठी प्रगती करावी म्हणून त्यांना प्रोत्साहित करणे आणि गावातील तरुण मुलांना सामाजिक स्तरावर प्रबोधन करणे असे भविष्यात उपक्रम राबविण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तरी या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे तसेच अधिक माहितीसाठी कार्यवाह – समीर मयेकर ( 98908 40382) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष विलास कांडर यांनी केले आहे.