प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू;विशेष ताप रुग्ण सर्व्हेक्षण
कणकवली
कणकवली तालुक्यामध्ये डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ होत असून आजपर्यंत विविध गावांतील मिळून जवळपास १४० सिरम सॅम्पल घेऊन त्यांची डेंग्यू तपासणी करणेत आली असून यामध्ये शिरवल-४, दारिस्ते – २, हळवल – १, सांगवे – १, बावशी- १, नागवे – १, बिडवाडी- १, कलमठ- १, सातरल- १, कणकवली शहर-२ असे मिळून १५ डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत .
सदयस्थीतीमध्ये हे सर्व रुग्ण देखरेखीखाली असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे. वरील पैकी फक्त शिरवल येथे डेंग्यू साथ घोषित करणेत आलेली होती तेथे आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच राबविणेत आल्याने सदर साथ नियंत्रणात आलेली आहे. कणकवली तालुक्यामध्ये डेंग्यू रुग्ण आढळलेल्या सर्व भागांमध्ये तात्काळ विशेष ताप रुग्ण सर्व्हेक्षण आरोग्य विभागामार्फत करणेत आले असून सदर भागामध्ये नव्याने डेंग्यू रुग्ण आढळलेले नाहीत. सदर गावांमध्ये ग्रामपंचायत सहकार्याने डास अळी घनता वाढ असलेल्या भागामध्ये तातडीने धूर फवारणी करून घेणेत येत आहे. तसेच तालुक्यातील सर्व गावांमध्ये आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका सीएचओ यांच्या माध्यमातून उपाययोजना राबविणेत येत आहेत.
दैनंदिन व नियमित ताप रुग्ण सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका घरोघरी जावुन डेंग्यू या आजाराबाबत सर्व्हेक्षण करून या आजाराबाबत घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन करून आरोग्य शिक्षण देत आहेत. सर्व्हेक्षणात ताप रुग्ण आढळल्यास त्याचे डेंग्यू, मलेरिया तपासणी करिता रक्त नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवून त्याबाबतची तपासणी तातडीने करून घेणेत येत आहे.
किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण किटकजन्य आजरांचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका यांचेमार्फत गृहभेटीदरम्यान डास अळयांचा शोध घेउन त्यामध्ये टेमिफॉस / ॲबेट या किटकनाशकाचा वापर करून या अळया नष्ट करणेत येत आहेत. याचबरोबर जिल्हास्तरीय किटक समाहारकामार्फत बाधीत भाग व लगतच्या भागातील डास अळी घनता पडताळणी केली जात असून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणेत येत आहेत.
जिल्हा रेण्वीय निदान प्रयोगशाळा या ठिकाणी डेंग्यू या आजाराची तपासणी दैनंदिन करणेची सुविधा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. दुषित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना आरोग्य यंत्रणेमार्फत त्वरीत औषधोपचार करण्यात येत आहे.
तालुकास्तरावर रॅपिड रिस्पॉन्स टिम व साथ नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करणेत आलेला असून त्यांच्यामार्फत कार्यक्षेत्रामध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन प्रतिबंधात्मक उपायोजना राबविणेबाबत मार्गदर्शन करणेत येत आहे. डेंग्यू बाधीत भागात आवश्यक तेथे वैद्यकिय पथके पाठवुन रुग्णाना सेवा देण्यात आलेली आहे.