You are currently viewing मुंबई विद्यापीठाचा ५६ वा विभागीय युवा महोत्सव आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात संपन्न.

मुंबई विद्यापीठाचा ५६ वा विभागीय युवा महोत्सव आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात संपन्न.

वैभववाडी

शैक्षणिक वर्ष २०२३/२४ चा मुंबई विद्यापीठात मार्फत घेण्यात येणारा ५६ वा विभागीय युवा महोत्सव वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरुवार दिनांक १० ऑगस्ट,२०२३ रोजी संपन्न झाला. या सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३८ महाविद्यालयातील जवळपास ११०० विद्यार्थ्यांनी नाट्य, संगीत, कला, ललित कला, लोकनृत्य अशा ३३ सांस्कृतिक कला प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवला.
या युवा महोत्सवाचे उद्घाटन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समितीचे अध्यक्ष मा. श्री. सज्जन विनायक रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे यांनी विद्यार्थ्यांना सर्व कलाप्रकारांचे आपल्या भावी आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे हे विशद करताना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवून व यशस्वी होऊन मुंबई विद्यापीठामध्ये आपले स्वतःचे, महाविद्यालयाचे व आपल्या जिल्ह्याचे नाव रोशन करावे असे आवाहन केले. मुंबई विद्यापीठातील विविध महाविद्यालयांमधून दरवर्षी अतिशय उत्कृष्ट कलाकार निर्माण होत असतात व ते या युवा महोत्सवामधूनच घडत असतात असे त्यांनी सर्वांना सांगितले. उद्घाटनाप्रसंगी शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. शरदचंद्र रावराणे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य मा.श्री. धनेश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, सिंधुदुर्ग जिल्हा सांस्कृतिक समन्वयक डॉ. आशिष नाईक, सह समन्वयक डॉ. नितीन वळंजु, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, वैभववाडी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. दिनेश बेटकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रतिनिधी श्री. शिवाजी भवसार, सांस्कृतिक समन्वयक, स्पर्धक व विद्यार्थी उपस्थित होते.
संपूर्ण दिवसभर चाललेल्या या युवा महोत्सवामध्ये सर्व स्पर्धकांनी विविध कलाप्रकारांमध्ये आपले चांगले सादरीकरण केले.
या स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या सत्रामध्ये पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या समारंभामध्ये सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्राचे वितरण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या विभागीय महोत्सवामध्ये यशस्वी झालेल्या सर्व स्पर्धकांना मुंबई विद्यापीठ येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेमध्ये आता सहभागी होता येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभाला मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री निलेश सावे, स्थानिक समिती अध्यक्ष मा. श्री.सज्जनकाका रावराणे, विश्वस्त श्री. शरदचंद्र रावराणे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य माननीय श्री.धनेश सावंत मुंबई विद्यापीठामधून आलेले सर्व कलाप्रकारांमधील दिग्गज परीक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ.आशिष नाईक, सह समन्वयक डॉक्टर नितीन वळंजु, विविध महाविद्यालयामधील सांस्कृतिक समन्वयक स्पर्धक व विद्यार्थी उपस्थित होते.
या युवा महोत्सवाला महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.विनोद तावडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सांस्कृतिक समितीने विशेष प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा