मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
पुरोगामी विचारांसाठी आयुष्य समर्पित करणारे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत प्रा. हरी नरके यांचे बुधवारी वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेच्या उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी प्रा. हरी नरके आजच पहाटे पुण्याहून मुंबईला येत होते. येताना पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यामुळे बीकेसीच्या एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर उपचारां दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
प्रा. नरके हे समतेच्या चळवळीतील नेतृत्वासाठी प्रसिद्ध होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अभ्यास विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची कामगिरी लक्षणीय होती. सध्या ते समता परिषदेचे उपाध्यक्षपद सांभाळत होते. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या माध्यमातून त्यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींच्या कलाकृतींचे संपादन केले.
१ जून १९६३ रोजी पुणे जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या प्राध्यापकांनी आपले बहुतांश शिक्षण पुण्यातून घेतले. प्रा. हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली. महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून सुपरिचित होते. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे देखील नरके प्रमुख होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. त्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळवून देण्यासाठी प्रा. हरी नरके यांनी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये सक्रियपणे काम केले. अभ्यासपूर्ण आणि बौद्धिक चर्चांमुळे त्यांची ओळख सर्वत्र झाली. विविध व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रा. हरी नरके पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले.
“महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“महाराष्ट्राच्या विचार – व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा. हरी नरके यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवनपरिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन यांचा त्यांचा व्यासंग होता. यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास -संशोधनात्मक सकारात्मक प्रवाहाची हानी झाली आहे,” असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने महात्मा फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा अभ्यासक गमावला आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, “प्रा. हरी नरके यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून नेहमी महात्मा फुले यांचे विचार मांडले. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !”
“ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतिशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. तत्कालिन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ज्ञ सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरिरीने मांडणारे, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेले बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यानी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.