You are currently viewing जागतिक मैत्री दिनानिमित्त चर्चासत्र संपन्न

जागतिक मैत्री दिनानिमित्त चर्चासत्र संपन्न

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

दक्षिण मुंबई कॅटरिंग आणि इव्हेन्ट असोसिएशनच्या वतीने ८ ऑगस्ट २०२३ रोजी जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून चर्चासत्राचे आयोजन गणराज सभागृह, अभ्युदय नगर, काळाचौकी येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कॅटरिंग उद्योजक सतीश काणेकर, दक्षिण मुंबई कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन कोलगे, सुधीर पवार व्यासपीठावर उपस्थित होते. नितीन कोलगे यांनी आपल्या कल्पकतेनुसार सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत केले.

सतिश काणेकर यांनी कॅटरिंग क्षेत्रातील ६६ वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी सर्व उपस्थित कॅटरिंग आणि डेकोरेटर्स यांच्यासमोर नेमक्या शब्दांत उलगडली. व्यवसायात निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यांचे निवारण कसे करायचे ह्या संदर्भात एक अभ्यासपूर्ण चर्चा मैत्रीपूर्ण वातावरणात उपस्थितांमध्ये झाली. त्यावेळी सुधीर पवार यांनी एकजुटीचे महत्व पटवून दिले, तर संतोष शेट्ये आणि फतेहसिंग गुजर यांनी कार्यक्रमाचे पद्धतशीर नियोजन केले.

सदर चर्चासत्रामध्ये पोपट शिंदे, निशांत घाडीगांवकर, किरण डांगे, संतोष नरे, राजू शिंदे, दिपक मोरे, अमृता चव्हाण, नामदेव पाष्टे, सुनील सावंत, शशिकांत पाटील यांनी तळमळीने आपल्या व्यवसायातील आव्हानांचे आणि समस्यांचे मुद्दे मांडले. त्यावेळी इतर सभासदांनीही त्यांना साथ दिली.

दक्षिण मुंबई कॅटरिंग असोसिएशन कोविड काळापासून गोरगरिबांना किराणा सामानाचे वाटप करण्याबरोबरच घोंगडी वाटप तसेच अन्नदान करत आहेत. असोसिएशनचे जेवढे सभासद आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन त्यांचे नैतिक अधिकार, जबाबदारी यांची जाणीव करून देण्यात आली. त्यासोबतच ह्या व्यवसायात एकमेकांना अडीअडचणीच्या काळात कशी मदत करावी, ह्याचेही मार्गदर्शन चर्चासत्रामध्ये करण्यात आले. असोसिएशनच्या वतीने भविष्यात जे काही उपक्रम राबविले जाणार आहेत त्यांना त्यामुळे नैतिक अधिकार प्राप्त होईल. त्यासाठी लवकरच धोरणात्मक बैठक घेण्याचे ठरले.

कार्यक्रमाच्या शेवट मैत्री दिनाची गाणी आपल्या सुंदर आवाजात अशोक पवार यांनी सादर केली. तसेच सर्व डेकोरेटर्स आणि कॅटरिंग उद्योगातील मान्यवरांनी जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने एकमेकांना गुलाब पुष्प देऊन भेटीचा आनंद द्विगुणीत केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा