*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित क्रांतीदिन निमित्त आठवणी जागविणारी काव्यरचना*
*” चले जाव “चा नारा*
————————————
दिनी आजच्या नभी गर्जला ‘ चले जाव ‘ चा नारा
जोश त्यातला पाहुन सारा जसा थांबला वारा
साधी भोळी जनता इथली परचक्राने पिचली
स्वातंत्र्याच्या यज्ञी त्यांनी घरही केले कारा
निधड्या छाती वरी झेलल्या शूरविरांनी गोळ्या
स्वर्गामधुनी जशा उधळल्या मोती जैश्या गारा
डळमळले ते तख्त आणखी कंपित झाला गोरा
जगात मोठ्या साम्राज्याचे जसे वाजले बारा
किती फोडले, किती झोडले कुणी न सोडी झेंडा
जात धर्म मग त्यजून अपुला एक दिलाने सारा
सत्य, अहिंसा, शांती, प्रितिची इथेच होती शिकवण
शस्त्र टाकुनी फकीर नंगा चढवत गेला पारा
त्या विरांना कृतज्ञतेने अजून करतो वंदन
प्रणाम त्यांना करता आता नयनी लागे धारा
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
06.08.2023