*ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अधिवेशन जळगांव येथे संपन्न*
वैभववाडी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन गांधी तीर्थ जैन हिल्स, जळगांव येथे दि.५ आणि ६ ऑगस्ट २०२३ रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य कार्यकारिणीच्या उपस्थित संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.अशोकभाऊ जैन यांच्या शुभहस्ते झाले.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, थोर स्वातंत्र्यसेनानी, ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्थापित “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” संस्थेचे राज्य अधिवेशन-२०२३ गांधी तीर्थ, जैन हिल्स जळगांव येथे उत्साहात संपन्न झाले.
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. अशोकभाऊ जैन यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद आणि ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संघटक श्री.सर्जेराव जाधव, सहसंघटिका सौ.मेधाताई कुलकर्णी, सचिव श्री.अरुण वाघमारे, सहसचिव प्रा.श्री.एस. एन.पाटील, कोषाध्यक्षा सौ. सुनीता राजेघाडगे, सदस्य प्रमोद कुलकर्णी, जळगाव शहर वाहतूक शाखेचे लीलाधर कानडे, जळगाव सायबर शाखेचे डी.बी.जगताप, वैद्यमापनचे बाळासाहेब जाधव, नाशिक विभाग अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे, संघटक श्री. संजय शुक्ल, सचिव प्रा.डॉ. ए.बी.महाजन, जिल्हाध्यक्ष मनोज जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.अशोकभाऊ जैन यांना संस्थेच्यावतीने पुणेरी पगडी, उपरणे, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन उद्योग क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
उद्घाटनपर भाषण करताना अशोकभाऊ जैन म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण खरेदी करतो. त्यावेळी आपण ग्राहकाची भूमिका सजगतेने बजावली पाहिजे. उद्योजक, व्यापारी सुद्धा ग्राहकच आहे.संस्थेच्या माध्यमातून ग्राहक जागृतीचे कार्य सुरू आहे, या पवित्र कार्याला जैन उद्योग समूहाच्यावतीने कायम शुभेच्छा आहेत.
अर्थव्यवस्थेचे पंचप्राण असलेल्या घटकांना विभागनिहाय शेतकरी, व्यापारी, श्रमिक आणि ग्राहक यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कोकण विभागातून श्री. विलास महादेव देसाई यांना शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्राहक चळवळीशी संबंधित असलेल्या ग्राहक न्याय या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
उद्घाटन समारंभ नंतर
संस्थेच्या सहसंघटिका मेधाताई कुलकर्णी यांनी संस्था, रचना व कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. संस्थेचे संघटक श्री.सर्जेराव जाधव यांनी शेतकरी ग्राहक- सातबाराचे वाचन या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर विभाग, जिल्हा व तालुकानिहाय अध्यक्ष, संघटक, सचिव व कोषाध्यक्ष यांच्यामध्ये गटचर्चा होऊन जिल्हा अध्यक्ष व संघटकांनी वार्षिक अहवाल सादर केले. त्यानंतर ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्यावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली.
रविवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी सकाळी पीसवॉक हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला.
विदर्भ प्रांत अध्यक्ष शामकांत पात्रीकर यांनी ग्राहक चळवळ, समस्या निवारण व प्रशासकीय निवेदने पद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड.विजेता सिंग यांनी नवीन ग्राहक संरक्षण कायदा-२०१९ मधील तरतुदी, राज्य सचिव श्री.अरुण वाघमारे यांनी जिल्हा व राज्य ग्राहक संरक्षण परिषद रचना व कार्यपद्धती, राज्य सहसचिव प्रा.श्री.एस.एन. पाटील यांनी सजग विद्यार्थी ग्राहक अभियान व त्याची अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ.प्रसंन्नकुमार रेदासनी यांनी रेड क्रॉस ब्लड बँकचे कार्य व महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर विभागनिहाय उत्कृष्ट ग्राहक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोकण विभागातून श्री.संदेश तात्या तुळसणकर यांना उत्कृष्ट ग्राहक कार्यकर्ता पुरस्कार-२०२३ देऊन गौरवण्यात आले.
समारोप प्रसंगी संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांचा त्यांचे ग्राहक चळवळीतील योगदान आणि त्यांच्या दासबोध चिंतनसार या ग्रंथाला पुरस्कार मिळाल्याबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे प्रतिमा, पगडी व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचा कार्यकर्ता व पदाधिकारी याला आपल्या संस्थेच्या कार्यपद्धतीची ओळख झाली पाहिजे. कार्यकर्त्या म्हणून समाजात काम करीत असताना येणाऱ्या अडचणी, त्यावर मार्गदर्शन व्हावे, त्याला योग्य दिशा मिळावी म्हणून अशा प्रकारच्या राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात येते.
कार्यकर्त्यांने स्वतः सजग राहून इतरांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे असे समारोप प्रसंगी डॉ.विजय लाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले. या अधिवेशनाला २६ जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून जवळपास ३०० प्रतिनिधी उपस्थित होते.
कोकण विभागातून प्रा.श्री.एस. एन.पाटील, श्री.तेजस साळुंखे, श्री.विलास देसाई, सौ.अनघा देसाई, श्रीम.गीतांजली कामत, आयेशा सय्यद, श्री.संदेश सावंत, श्री.दिपक साळवी, श्री.नवीनकुमार पांचाल, श्री. धनाजी पवार,ॲड.हर्षा चौकेकर व श्रुती सादविलकर असे बारा प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय शुक्ल व प्रा.डॉ. ए.बी. महाजन यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राज्य कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली नाशिक विभाग आणि जळगाव जिल्हा यांच्यावतीने करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष मनोज जैन, तालुका अध्यक्ष महेश चावला, संघटक सतीश गढे, सचिव उदय अग्निहोत्री, डॉ.नितीन धांडे, गुरुबक्ष जाधवानी, अविनाश सोनगीरकर व विकास वाणी आदीनी विशेष परिश्रम घेतले.