*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री डॉ.गौरी एदलाबादकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*फुले वाटेत सांडली*
———————-
माहेर माझे जणू
समृद्ध पुष्पवन!
एकेक नाते वाटे
मोहक सुमनं!
मायबापाचे खोड
भक्कम कणखर,
तयाच्या आधारे हा
वेलू वाढला भरभर!
बहिणी वाटे मज
फुल बकुळ,
दुरूनही येई
मंद दरवळ !
आजी आजोबा
होते प्राजक्त,
देणे भरभरून
नाही जराही आसक्त!
काका काकू आत्या
चाफा चमेली जाई,
संगत मिळे मौसमातच
पण मन भरून जाई!
आजोळाला माझ्या
मोगऱ्याचा गंध ,
दूर जरी जुळले
दृढ ऋणानुबंध !
सारी फुले भरून ओच्यात
सासरची वाट धरली,
वाटे इथे येता येता
फुले वाटेत सांडली !
राहिली जरी ती
आता नातीसुमनं दूर,
जुळले आहेत
जन्मभराचे सूर !
नाही सोबत तयांची
तरी सुवास ऊरात,
जपला तो मी
निरंतर हृदयात !
एकेक फुलांनी या मज
दिली शिकवण अनमोल,
आली आयुष्यभर कामात
रूजली अंतरी सखोल !
डॅा गौरी एदलाबादकर