*अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेऊन मांडणार वीज ग्राहकांच्या समस्या*
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची सभा कुडाळ येथील अनंत मुक्ताई हॉलमध्ये अध्यक्ष श्री.संतोष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी ४.०० वाजता पार पडली. जानेवारी २०२२ मध्ये महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची स्थापना होऊन जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविणे हेच वीज ग्राहक संघटनेचे ध्येय आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना स्थापन झाल्यानंतर जिल्हाभरातील आठ तालुक्यात असलेल्या वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याचाच एक भाग म्हणून दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्हा कार्यकारिणीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या वीज ग्राहकांना विजेच्या संदर्भात समस्या आहेत त्यांना सभेला उपस्थित राहून समस्या मांडण्याचे आवाहन करण्यात आले होते.
सभेच्या सुरुवातीला जिल्हा सचिव निखिल नाईक यांनी सर्वांचे स्वागत करून सभेचा उद्देश आणि महत्त्व विशद केले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांना भेडसावत असलेल्या समस्या आणि त्याचे निवारण कसे करता येईल यावर विस्तृत भाष्य केले. वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ कोण आहेत? कोणाकडे तक्रार मांडायची वगैरे बाबत माहिती दिली. त्यानंतर सभेसाठी उपस्थित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील तक्रारदार वीज ग्राहकांच्या समस्या सविस्तर जाणून घेतल्या, त्याचप्रमाणे तक्रारी लेखी लिहून घेत लवकरच जिल्हा कार्यकारिणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वीज वितरणचे अधीक्षक अभियंता श्री.विनोद पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील माडखोलचे माजी सरपंच संजय लाड यांनी आपल्या गावासह जिल्ह्यात वीज वितरण संदर्भात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचा पाढाच वाचला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरणकडे कंत्राटी कामगार असल्याने पावसाळ्यापूर्वी विजेच्या तारांवर धोकादायक असलेली झाडे वेली आदिंची छाटणी न केल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या निर्माण होत असल्याचे सांगत, वीज वितरणने रोजंदारीवर कामगार घेऊन मे महिन्यात धोकादायक असलेली झाडे, फांद्या आदी तोडून वीज वाहिन्या सुरक्षित केल्यास पावसाळ्याच्या सुरुवातीला निर्माण होणाऱ्या विजेच्या समस्या टाळता येतील, तशाप्रकारे प्रयत्न करण्याचे वीज ग्राहक संघटनेला आवाहन केले. त्याचबरोबर श्री.गुरुनाथ कुलकर्णी यांनी तांत्रिक बाबींवर प्रकाशझोत टाकताना वीज वितरण कडून दुरुस्ती करून आणलेले ट्रान्सफॉर्मर सदोष असतात की निर्दोष हे कोणीही पाहत नसल्याने मोठ्या प्रमाणावर वीज गळती होते परंतु यावर कोणताही उपाय न करता वीज वितरण कंपनी मात्र त्याचा अधिभार ग्राहकांवर लादून नाहक पैसे उकळत असल्याचे सांगितले.
श्री.विलास कोरगावकर यांनी वीज वाहिन्यांना बऱ्याच ठिकाणी झाडांचा स्पर्श होत असल्याने मोठ्या प्रमाणावर वीज गळती होते आणि त्याचा फटका वीज वितरण स्वतःला न बसू देता ग्राहकांच्या माथी मारत वीज अधिभार लावत असल्याचे सांगून त्याविषयी आवाज उठविण्याचे आवाहन केले. सावंतवाडी येथील दीपक पटेकर यांनी वीज वितरण कंपनीने विज बीले घरपोच देणे बंधनकारक असतानाही आर्यन एजन्सी ही वीज वितरण कंपनीकडून वीज बिले घरपोच देण्याचे कंत्राट घेतलेली एजन्सी विज बिले घरपोच न देता इमारतींच्या पार्किंग आदी ठिकाणी वीज मीटरला अथवा संरक्षणासाठी लावलेल्या जाळिला लावून ठेवत असल्याने विज बिल गहाळ होऊन दंड भरावा लागतो त्यामुळे नाहक भुर्दंड ग्राहकांना पडतो याविषयी तक्रार मांडली.
झाराप येथील सदाशिव आळवे यांनी वीज वितरण बाबत अनेक समस्या मांडल्या. वेंगुर्ले येथील अभिषेक वेंगुर्लेकर, श्रीनिवास गावडे यांनी जीर्ण विजेचे खांब, लोखंडी ऐवजी वापरण्यात येणारे सिमेंटचे खांब आदी विज संदर्भात समस्या मांडून निवारण करण्याविषयी मार्गदर्शन केले. कुमार कामत यांनी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी वीज जोडणी देताना कशा प्रकारे फसवणूक करतात, भीती दाखवतात व नाहक वीज बिल भरून घेतात याचे दाखले देत तक्रारी मांडल्या. जिल्हाभरातून आलेल्या अनेक तक्रारदारांनी आपापल्या तक्रारी वीज ग्राहक संघटनेकडे मांडून त्यावर योग्य ते उपाय करण्याचे आवाहन केले सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेकडून योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन देखील देण्यात आले.
यावेळी वीज ग्राहकांना अध्यक्ष संतोष काकडे, राजेश राजाध्यक्ष, ॲड.नंदन वेंगुर्लेकर, ॲड.नितीन म्हापणकर, निखिल नाईक, श्रीराम शिरसाट यांनी योग्य असे मार्गदर्शन करून वीज ग्राहक सोबत असतील तर आम्ही पाठीशी राहून सर्व समस्यांचे निराकरण करून घेऊ असे आश्वासन दिले. वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय वीज वितरण कंपनी ग्राहकाची वीज जोडणी तोडू शकत नाही. अगदी पन्नास टक्के वीज बिल भरले तरी वीज ग्राहकांची वीज जोडणी वीज वितरण कंपनीला तोडता येत नाही. असे अनेक विषय राजेश राजाध्यक्ष यांनी वीज ग्राहकांच्या समोर ठेवल्याने अनेकांना वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार आणि ग्राहकांचे हक्क या संदर्भात माहिती मिळाली.
सभेच्या उत्तरार्धात सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संतोष काकडे यांनी आपल्या वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याने त्यांचा राजीनामा मंजूर करून सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्षपदी श्रीराम शिरसाट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी लवकरच जिल्हा भर दौरा करून वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नवनियुक्त अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांचे पुष्पगुच्छ देऊन संतोष काकडे व सर्व तालुक्यातील वीज ग्राहकांनी अभिनंदन केले.
या सभेसाठी अध्यक्ष संतोष काकडे, नवनियुक्त अध्यक्ष श्रीराम शिरसाट, सचिव निखिल नाईक, उपाध्यक्ष ॲड.नितीन म्हापणकर, राजेश राजाध्यक्ष, ॲड.नंदन वेंगुर्लेकर, अभिषेक वेंगुर्लेकर, डॉ.श्रीनिवास गावडे, अशोक करंबेळकर, दीपक पटेकर, मंदार नाईक, संजय लाड, निलेश तेली, भूषण मठकर, शार्दुल घुर्यें, गुरुनाथ कुलकर्णी, विलास कोरगावकर, अवधूत शिरसाट, समीर म्हाडगुत, सदाशिव आळवे, संजय नाईक, शिवराम आरोलकर, कुमार कामत, विराज पाटकर अधिकारी कार्यकारणी सदस्य तथा वीज ग्राहक उपस्थित होते.