You are currently viewing क्षण सौख्याचे

क्षण सौख्याचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर (अमेरिका) लिखित अप्रतिम लेख*

 

*क्षण सौख्याचे*

 

आयुष्य नसे सोपे

तरी आनंदाने जगायचे

घेऊन सोबतीस

क्षण आपुल्या सौख्याचे

 

जीवनाची वाटचाल अत्यंत कठीण, काट्याकुट्यांनी भरलेली, अनंत खाच खळगे त्या वाटेवर. पण म्हणून चालणे सोडायचे का?

चालता चालता मार्गावर एखादा शांत तलाव आपल्याला दिसतो, त्या तलावात स्वच्छंदपणे विहार करणारी बदके पाहून मन सुखावते. तलावाभोवतीची हिरवळ आपल्या डोळ्यांना आनंद देते, त्यावेळी वाटेतल्या खड्ड्यांचा आपल्याला विसर पडतो.

जीवनात येणारे छोटे मोठे हे सुखाचे क्षण ही आपल्या आनंदाची शिदोरी आहे.

विद्यार्थी दशेत असताना परीक्षा नको वाटतात. अभ्यास करायचा, सर्व लक्षात ठेवायचे,

फारच कठीण काम.परीक्षेला जाताना माझ्या तर छातीत नेहमी धडधड व्हायचे. मला काही आठवलं नाही तर? असा विचार येऊन भूक तहान निघून जायची पण नंतर रिझल्ट लागल्यावर माझा पहिला नंबर आला म्हणून तीच मी शाळा ते घर धावत येऊन ” माझा पहिला” करून आजीला बिलगायची. हा सौख्याचा क्षण कधी विसरता येईल का? या छोट्याशा यशाने पुढचा अभ्यास करण्यास किती हुरुप यायचा म्हणून सांगू?

शाळेतल्या मैत्रिणी, एकमेकींच्या डब्यातले खाणे या छोट्या छोट्या गोष्टींनी जीवन सुखमय होते.

यौवनात पदार्पण हे आयुष्यातील अतिशय मोहक स्थित्यंतर! तरुण उच्छृंखल मन, हवाहवासा वाटणारा सहवास, त्या सहवासातील सौख्य हे शब्दातीत आहे. प्रियकराची वाट पाहणे आणि नंतर तो भेटीचा क्षण. अहाहा! विसरता न येणारे असे हे आयुष्यातील सुखद क्षण! म्हणूनच तर या असल्या क्षणांवर मंगेश पाडगावकरांसारख्या कवींनी प्रेम गीते लिहिली.

” शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी

चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी ”

किंवा” स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” ही गाणी ऐकताना आपल्या जीवनातील या सुखाच्या क्षणांचे स्मरण झाल्याशिवाय राहील का?

लक्ष्मीच्या पावलाने मुलगी जेव्हा सासरच्या घरी येते त्यावेळी….

” क्षण आला भाग्याचा

आला सौख्याचा

हासत मोदे नाचत नादे

हे मन माझे” अशी तिची मनोवस्था असते. माहेर सोडल्याचे दुःख आणि नव्या संसाराचे स्वप्न या संमिश्र भावना नवविवाहितेच्या मनात असल्या

तरी मनाच्या एका कोपऱ्यात विवाहाचा सौख्यदायी क्षण कायमस्वरूपी स्थानापन्न झालेला असतो हे निःसंशय!

मातृत्वाची चाहूल आणि त्यानंतर आई होणे या क्षणा इतका सौख्याचा दुसरा क्षण कोणता असू शकतो? नऊ महिने गर्भात वाढविल्यानंतर बाळाच्या एका ट्याहयाने प्रसूतीच्या असह्य वेदना माता एका क्षणात विसरते.

मला आठवते मला प्रसववेदना सुरू झाल्या तेव्हा मी आईला विचारले होते, ” तुला कशा ग आम्ही पाच जणी झालो? तू कसे काय सहन केलेस? ” तेव्हा आई इतकंच म्हणाली होती, ” तुलाही होतील. ” तो क्षणच इतका सौ ख्याचा आहे की त्या एका क्षणात स्त्री तिच्या असह्य वेदना पार विसरून जाते. तिच्या लेखणीतून शब्द पाझरतात,

” जीवन माझे कृतार्थ झाले

ज्या दिवशी मी आई झाले”

आयुष्याच्या उत्तरार्धात ” भेटी लागी जीवा

लागलीसे आस” अशी मनाची अवस्था होते. संसाराची आसक्ती हळूहळू कमी होऊन मन ईश्वराच्या भजन पूजनात अधिक रमते. या संदर्भात मला माझ्या आयुष्यात घडलेली एक घटना वाचकांना सांगावीशी वाटते.

गान मार्तंड पंडित जसराज यांच्या मैफिलीला गेले असताना त्यांच्या गाण्याने मी इतकी प्रभावित झाले की कार्यक्रम संपल्यानंतर कशाचेही भान न बाळगता मी तडक व्यासपीठाकडे धावले, पायातील चपला भिरकावल्या आणि पंडितजींच्या चरणांवर मी माझे मस्तक ठेवले. त्या क्षणी माझ्यासाठी ते पंडित जसराज नव्हते तर त्यांच्या रूपात मला साक्षात भगवान विष्णूचे दर्शन घडले होते.

समर्पणाची भावना दुसरी काय असू शकते? जन्म ते मृत्यू या आयुष्याच्या कोऱ्या पानांवर आपण अनुभवलेले हे छोटे छोटे सुखाचे क्षण लिहून ठेवायचे म्हणजे वाटेतल्या काट्यांनी आपण कधीच रक्तबंबाळ होणार नाही.

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

प्रतिक्रिया व्यक्त करा