You are currently viewing मुंबईत ‘बेस्ट कोंडी’ कायम

मुंबईत ‘बेस्ट कोंडी’ कायम

*लेखी आश्वासन मिळेपर्यंत ‘काम बंद’ आंदोलन सुरूच राहणार*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

पगारवाढ, मोफत बेस्ट बस प्रवास आदी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले असले, तरी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील कंत्राटी कामगारांनी घेतली आहे. त्यामुळे बुधवारपासून सुरू असलेले कंत्राटी कामगारांचे ‘काम बंद’ आंदोलन शुक्रवारीही सुरूच ठेवण्यावर कंत्राटी कामगार ठाम आहेत. त्यामुळे मुंबईची दुसरी लाइफलाईन असलेल्या मुंबईकरांची ‘बेस्ट कोंडी’ शुक्रवारी कायम राहणार आहे. दरम्यान, मातेश्वरी, डागा ग्रुप, हंसा, टाटा कंपनी, ओलेक्ट्रा स्विच मोबॅलिटी या कंत्राटी कंपन्यांच्या १,६७१ बसेसपैकी फक्त ६६२ बसेस गुरुवारी प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावल्या, तर १,००९ बसेस बस आगारात उभ्या राहिल्याने बेस्ट प्रवाशांचे सलग दुसऱ्या दिवशी मेगा हाल झाले.

मोफत बेस्ट बस प्रवास, पगारवाढ, नादुरुस्त बसेस दुरुस्त करूनच बस आगाराबाहेर सोडाव्यात, अशा विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कामगारांनी बुधवारी ‘काम बंद’ आंदोलन छेडले. कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे प्रवाशांना फटका बसला. परंतु बेस्ट उपक्रम, राज्य सरकार व कंत्राटी कंपनीकडून कुठलेही ठोस आश्वासन न मिळाल्याने आपल्या भूमिकेवर ठाम असलेल्या ५०० हून अधिक कंत्राटी कामगारांनी गुरुवारीही काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३,३२८ बसेस असून, एक हजार बसेस रस्त्यावर धावल्या नसल्याने प्रवाशांचे मेगा हाल झाले.

दरम्यान, संपकरी कंत्राटी कामगारांच्या कंपन्यांवर कंत्राटाच्या अटी- शर्तीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. वाढत्या महागाईमुळे १८ हजार रुपये पगार २५ हजार रुपये करण्यात यावा, बेस्ट उपक्रमाच्या कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे कंत्राटी कामगारांनाही बेस्ट बसच्या मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी मुलुंड व घाटकोपर बस आगारातील डागा ग्रुपच्या ५०० हून अधिक कंत्राटी चालकांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केली असता कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी गुरुवारी १२ डेपोंतील डागा ग्रुप, मातेश्वरी व टाटा कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरूच ठेवले.

*भेटी आणि आश्वासने*

शिवसेना (शिंदे गट) नेते किरण पावसकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा प्रश्न सोडवितो, असे आश्वासन त्यांनी दिले. भाजप कामगार संघाचे मुंबईचे समन्वयक आणि बेस्ट समितीचे माजी सदस्य सुनील गणाचार्य यां आंदोलनाला भेट दिली. बेस्ट प्रशासन, खासगी कंत्राटदारांचे मालक तसेच शासनासोबत याविषयी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मुंबई उपनगराचे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेण्याचे आश्वासन गणाचार्य यांनी दिले. मनसेचे पदाधिकारी आंदोलकांना भेटून गेले.

प्रतिक्रिया व्यक्त करा