You are currently viewing कुणेकेरी शाळा नंबर १ येथील शाळा बंद आंदोलनाला अर्चना घारे परब यांनी दिली भेट.

कुणेकेरी शाळा नंबर १ येथील शाळा बंद आंदोलनाला अर्चना घारे परब यांनी दिली भेट.

शालेय मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन छेडण्याचा अर्चना घारे- परब यांनी दिला इशारा

सावंतवाडी

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज त्याच्यांच तालुक्यात शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना व पालकांना शाळा बंद आंदोलन छेडावे लागत आहे ही दुर्दैव असून केसरकर शिक्षण मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत त्यांनी वेळीच ही परिस्थिती सुधारावी अन्यथा मंत्री केसरकर यांच्याच निवासस्थानासमोर विद्यार्थी पालकांना घेऊन आंदोलन छेडावे लागेल असा इशारा राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महीला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी दिला.

कुणेकेरी शाळा नंबर १ मध्ये शिक्षकांची दोन पदे रिक्त झाल्याने शिक्षक मिळावा या मागणीसाठी विद्यार्थी पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आज शाळा बंद आंदोलन छेडले. या ठिकाणी आज सौ.घारे परब यांनी भेट देऊन त्यांची समस्या जाणून घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

दरम्यान शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या निष्क्रियतेमुळे ही वेळ आज पालक व शिक्षकांवर आली असून यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवूनही त्यांच्याकडून सुधारणा केली जात नाही ही खेदजनक बाब आहे. शिक्षकांसह ग्रामस्थ लोकप्रतिनिधी व विद्यार्थ्यांना यासाठी आंदोलन करावे लागते यापेक्षा दुर्दैव ते काय? आज गावागावातून जनतेचा उद्रेक पाहायला मिळत असून वेळीच ही परिस्थिती सुधारावी अन्यथा हा आपल्यालाही विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पुढाकार घेऊन वेळप्रसंगी मंत्र्याच्याच घरासमोर आंदोलन छेडावे लागेल.

दरम्यान रिक्त असलेल्या दोन पदवीधर शिक्षकांच्या जागी एक तरी पदवीधर शिक्षक मिळावा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही जोपर्यंत शिक्षक उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे असा इशारा ही शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजन मडवळ यांनी दिला. यावेळी सरपंच सोनिया सावंत, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष राजन मडवळ, सूर्यकांत सावंत, मंगेश सावंत ,आनंद गावडे, भरत सावंत, विश्राम सावंत, अनुराग गावडे, सुहास गावडे, योगेश परब,आनंद मिस्त्री, गुरु कुणकेकर, महेश गावडे, दीपक सावंत ,आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा