You are currently viewing भिडे यांना सात दिवसांत अटक करा; बसपाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

भिडे यांना सात दिवसांत अटक करा; बसपाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

भिडे यांना सात दिवसांत अटक करा; बसपाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

ओरोस

थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या तथाकथित संभाजी भिडे गुरुजींना ७ दिवसांच्या आत अटक करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन राज्यपाल व मुख्यमंत्री यांना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बहुजन समाज पार्टी यांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष पी. के. चौकेकर, जिल्हा प्रभारी रविंद्र कसालकर, सुधाकर माणगावकर, जिल्हा महासचिव आनंद धामापूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष नरेंद्र पेंडूरकर, विजय साळकर, दुलाजी चौकेकर, रंजन तांबे, सिध्दार्थ जाधव, भारत मालवणकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात, देशाला सामाजिक क्रांतीची दिशा दाखवण्याचे कार्य अविरतपणे महाराष्ट्र राज्याकडून केले जात आहे. संतांची भूमी अशी ओळख राज्याला मिळवून देणारे, समाज परिवर्तनासाठी झटणारे संत, अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार वाटचाल करीत पुरोगामी महाराष्ट्राने अवघ्या देशासह विश्वाला प्रेरणा दिली आहे. मात्र, बौद्धिक दिवाळखोरीने ग्रस्त काही तथाकथितांकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान गेल्या काही काळात केला जात आहे.
समाजा-समाजात दुही निर्माण करणाऱ्या या ‘समाजकंटाकांना’ राज्य सरकार मोकाट सोडत आहे. राजकीय हित जोपसण्यासाठी त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. ‘गुरुजी’ अशी बिरूद मिरवून राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कलुषित बुद्धीच्या संभाजी भिडे या व्यक्ती कडून केला जात आहे. या व्यक्तीची नुकतीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून यात तो महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. या व्यक्ती ने यापूर्वी महात्मा गांधी तसेच इतर महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले आहेत. राज्य सरकार चे अभय असल्याने भिडे आणखी बिनधास्त असल्याचे बहुजन समाज पार्टीचे मत आहे. अशा प्रवृत्तींना वेसण घालणे आवश्यक आहे. त्यामुळे भिडे यांना अटक करीत जेरबंद करावे अशी मागणी बसपाची आहे.
देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. केंद्र आणि राज्य सरकार या मुद्दयांना बगल देत आहेत. मुळ मुद्दयांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भिडे, महाराष्ट्रातचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सारख्या लोकांचा वापर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. अशा प्रवृत्ती विरोधात बसपाने आंदोलन छेडले आहे. मणिपूरमधील हिंसाचार, समान नागरी संहिता, देशातील बेरोजगारी, महागाई, धर्माधर्मामध्ये निर्माण झालेली धार्मिक तेढ यावर केंद्र आणि राज्यातील सरकार मुग गिळून गप्प बसले आहे. आता या सरकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम बसपा करणार आहे.
सरकारने पुढील ७ दिवसांमध्ये भिडे यांना अटक केली नाही तर राज्यभरात आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल. भिडेना अटक करण्यात आली नाही तर देशाच्या स्वातंत्र्यदिनी राज्याचे गृहमंत्री यांच्या निवासस्थाना बाहेर बसपा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा