You are currently viewing दोन महिन्याचा पगार न दिल्यामुळे ठेकेदाराच्या विरोधात सावंतवाडीत पालिका कंत्राटी कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन…

दोन महिन्याचा पगार न दिल्यामुळे ठेकेदाराच्या विरोधात सावंतवाडीत पालिका कंत्राटी कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन…

सर्वपक्षीय आक्रमक, मुख्याधिकार्‍यांना विचारला जाब

सावंतवाडी

दोन महिन्याचा पगार आणि साडे तीन वर्षाचा प्रायव्हेट फंड तटविणार्‍या ठेकेदारासह पालिका प्रशासनाच्या विरोधात आज येथील पालिकेच्या ६६ कंत्राटी कर्मचार्‍यांनी आज पालिका कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केले. जो पर्यंत आमच्या मागण्या पुर्ण होत नाही, तटलेली रक्कम परत दिली जात नाही, तो पर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान त्यांच्या या आंदोलनाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. या सर्व प्रकाराला पालिका प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप करीत त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना घेराव घातला.
यावेळी संबधित ठेकेदार आणि आमचा थेट संबंध नाही. मात्र त्यांना दोन्ही रक्कम मिळावी यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत, असे त्यांनी सांगितले. येथील पालिकेत काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना गेले दोन महिने पगार मिळालेला नाही तर तब्बल साडे तीन वर्षाचा प्रायव्हेट फंड मिळालेला नाही. त्यामुळे चिडलेल्या कामगारांनी आज येथील पालिका कार्यालयासमोर ठिय्या मांडला.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, मनसेचे अनिल केसरकर, आशीष सुभेदार, शुभम सावंत, हिदायतुल्ला खान, राकेश नेवगी, बावतीस फर्नाडीस, इफ्तिकार राजगुरू, शिवसेनेचे शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, विलास जाधव, रवी जाधव आदींनी त्या कर्मचार्‍यांना पाठिंबा दिला. जो पर्यंत कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटत नाहीत. तो पर्यंत आम्ही त्यांच्या सोबत असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सर्वांनी मिळून मुख्याधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी त्यांना पालिकेचे आरोग्य अधिकारी रसिका नाडकर्णी व पांडुरंग नाटेकर यांनी भूमिका समजावून सांगितली. यात कर्मचार्‍यांचे पैसे अडकले आहेत ते मिळवून देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या कर्मचार्‍यांनी पालिकेला सहकार्य करावे. संबधित ठेकेदारावर आम्ही थेट दबाव आणू शकत नाही. त्यामुळे त्यांनी पालिकेकडे ठेवलेल्या अनामत रक्कमेसह दोन महिन्याच्या रक्कमेतून संबंधित कर्मचार्‍यांचे पगार आणि पीएफ देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा