You are currently viewing 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग सज्ज….

9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग सज्ज….

सिंधुदुर्गनगरी 

राज्यातील 9 वी ते 12 वी वर्ग दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजीपासून सुरू करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने माध्यमिक शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असून आवश्यकत्या उपाययोजना पूर्ण करण्यात येत आहेत. शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व शाळांना आवश्यक त्या  उपाययोजना करण्याबाबत कळविण्यात आले आहेत.

            सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 247 माध्यमिक शाळा असून सुमारे 2200 शिक्षक, 900 शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच 9 वी ते 12 वी पर्यंतच्या वर्गांमध्ये 42 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोविड – 19 ची चाचणे करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोविड – 19 टेस्ट शासकीय रुग्णालयामार्फत करण्यात येणार आहे. सदर चाचण्यांविषयीचे नियोजन जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे. प्रमुख्याने 40 वर्षावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मधुमेह, रक्तदाब, अस्थमा, गंभीर आजार यासारखे आजार असतील तर त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे.  आवश्यकतेनुसार रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. प्राधान्यांने शाळेतील मुख्याध्यापक, किमान एक शिक्षक यांची प्रथम चाचणी करण्यात येईल. टप्प्या टप्प्याने सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

            शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना सर्व शाळांना कळविण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वीच्या उपाययोजना पुढील प्रमाणे आहेत. शाळेत हात धुण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, थर्मोमीटर, खर्मल स्कॅनर, गन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने सुनिश्चित करावे, शाळा वाहतुक सुविधांचे निर्जंतुकीकरण करावे, एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास प्रशासनाने ते इतर ठिकाणी हलवून शाळेचे हस्तांतरण करण्यापूर्वी पूर्णतः निर्जंतुकीकरण करावे, क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी. सर्व भागधारकांचे त्यांच्या विशिष्ट जबाबदाऱ्यांसहित विविध कार्यगट स्थापन करावे. शिक्षक, विद्यार्थी व इतर भागधारक या गटांचे सभासद म्हणून सहकार्याने काम करतील, शाळेत दर्शनी भागात शारीरिक अंतर, मास्कचा वापर या संदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे फलक प्रदर्शित करावे, थूंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फूट  इतके शारीरिक अंतर राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हे जसे चौकोन, वर्तुळ यांचा वापर गर्दी होणारी ठिकाणे जसे पाणी पिण्याच्या सुविधा, हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे या ठिकाणी करावा, शारीरिक अंतर राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात. परिवाठ, स्नेह संम्मेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक – पालक बैठका ऑनलाईन घ्याव्यात. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी याविषयी चर्चा करावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये, विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मुल्यांकनाकरिता विशिष्ठ योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या मार्फत तयार करण्यात येईल. विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांच्यात जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने पत्रके, पत्रे व सार्वजनिक घोषणांच्या माध्यमातून वैयक्तिक स्वच्छता व नेहमी वापरण्यात येणारे पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण इत्यादीबाबत काय करावे किंवा करू नये याबाबतच्या सूचना, शारीरिक अंतराचे महत्वा, स्वच्छता विषयच सवयी, गेरसमजुती, कोरोनाची लक्षणे दिसल्यास शाळेत जाणे टाळणे याविषयी कार्यवाही करावी. अधिक उच्च धोक्याच्या पातळीमधील कर्मचारी जसे वयोवृद्ध, दिव्यांग, गरोदर महिला कर्मचारी व जे कर्मचारी औषध-उपचार घेत आहेत. त्यांनी  अधिक काळजी घ्यावी, शक्यतो विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये.

            शाळा सुरू झाल्यानंतर पुढील प्रमाणे उपाययोजना कराव्यात. शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे, वर्गखोल्या नियमित स्वच्छ करणे, वर्गखोल्या व खोल्यांबाहेरील नेहमी स्पर्श होणारे पृष्ठभाग जसे लॅचेस, अध्ययन, अध्यापन साहित्य, टेबल, खुर्च्या यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे, कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावावी, हात धुण्याच्या ठिकाणी साबण, हॅन्डवॉश यांची व्यवस्था करावी. स्वच्छता गृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे. सुरक्षित व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांना सोबत वॉटर बॉटल आणण्यासाठी प्रोत्साहित करावे, शाळेत मास्कचा वापर करावा, विद्यार्थी मास्कची अदलाबदल करणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्गाची रोज साधी आरोग्य चाचणी जसे थर्मल स्कॅनिंग करावी. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणासही शाळेच्या आवारात व शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेश देऊ नये. विद्यार्थी सूचनांचे पालन करत नसल्यास पालकांच्या निदर्शनास आणावे, पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना स्वतःच्या वाहनाने शाळेत सोडावे. शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे, वाहन चालक व वाहक हे स्वतः तसेच विद्यार्थी शारीरिक अंतराचे पालन करतील याची दक्षता घ्यावी. बस, कार यांच्या खिडक्यांना पडदे नसावेत, सामान्यतः खिडक्या उघड्या ठेवाव्यात. वातानुकूलित बसमध्ये तापमान 24 ते 30 डिग्री राखावे. शक्य असल्यास हॅन्ड सॅनिटायझर ठेवावे. गर्दी टाळण्यासाठी एक दिवसआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे. वर्गनिहाय ऑनलाईन व ऑफलाईन वेळापत्रक, शिक्षकांची जबाबदारी निश्चिती याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल. प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी 3 ते 4 तासांपेक्षा जास्त असून नये अशा प्रकारच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. याची सर्व शाळांनी, शिक्षकांनी, पालकांनी काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा