You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा….

1 कोटी ५९ लाख ५३ हजार २४७ रुपये कर्जमाफी रक्कम जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाकडे जमा

सिंधुदुर्ग:
जिल्ह्यातील एक हजार २५५ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै आणि ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी जाहीर केली होती. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समावेश झाला असून एक कोटी ५९ लाख ५३ हजार २४७ रुपये एवढी कर्जमाफी रक्कम जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाकडे जमा झाली आहे.

जुलै आणि ऑगस्ट २०१९ मध्ये जिल्ह्यात मोठी पर्जन्यवृष्टी झाली होती. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. भात लावणी कालावधीत ही पर्जन्यवृष्टि झाल्याने जिल्ह्यातील शेतकाऱ्यांवर आभाळ कोसळले होते.

त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने कर्जमाफी जाहिर केली होती. शासनाने जाहिर केलेली ही कर्जमाफी रक्कम तब्बल एक वर्षानंतर जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाली आहे.

उशिरा का असेना कर्जमाफी रक्कम प्राप्त झाल्याने त्यावेळी बाधित झालेल्या जिल्ह्यातील एक हजार २५५ शेतकरी बांधवांमधून ऐन दिवाळीत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १३९ विकास सहकारी संस्था आहेत. यातील १०१ विकास सहकारी संस्थाकडून शेती कर्ज घेतलेले शेतकरी सभासद जुलै आणि ऑगस्ट २०१९ या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टित बाधित झाले होते. यामध्ये कणकवली २०, दोडामार्ग ४, देवगड ८, सावंतवाडी २७, वेंगुर्ले २०, मालवण २२ अशाप्रकारे विकास संस्थाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने या संस्थाकडून शेती कर्ज घेतलेल्या व बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मागविले होते. ते छानणी करून राज्य शासनाला सादर केले होते.

उपनिबंधक कार्यालयाने छानणी करून पाठविलेल्या सर्व प्रस्तावांना शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार एक हजार २५५ बाधित शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. त्यापोटी शासनाने एक कोटी ५९ लाख ५३ हजार २४७ रुपये एवढी रक्कम मंजूर करीत जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाकडे उपलब्ध केली आहे. त्यानुसार कणकवली ११२ शेतकरी ९ लाख ८१ हजार १३८ रुपये, दोडामार्ग ४३ शेतकऱ्यांसाठी ११ लाख १० हजार ३० रुपये, देवगड तालुक्‍यात ७३ शेतकरी ३५ लाख १ हजार ३३० रुपये, सावंतवाडी तालुक्‍यात ५०४ शेतकरी ७२ लाख ७८ हजार ७३१ रुपये, वेंगुर्ले तालुक्‍यात २४४ शेतकरी १९ लाख ६३ हजार १४४ रुपये, मालवण तालुक्‍यात २७२ लाभार्थी ३७ लाख ६१ हजार ४२२ रुपये अशाप्रकारे तालुकानिहाय शेतकरी निवड करीत त्यांची कर्जमाफी रक्कम जमा केली आहे.

व्यक्तिगत संस्थांच्या सभासदांनाही लाभ
विकास सहकारी संस्था बरोबरच राज्य शासनाने व्यक्तीगत सहकारी संस्था असलेल्या संस्थेकडून शेती कर्ज घेतलेल्या ७ शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. यासाठी ५ लाख ७ हजार ४५२ रुपये रक्कम उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा