सह्याद्री पट्ट्यात भुकंप सदृष्य धक्के ??
सह्याद्री पट्ट्यात भुकंप सदृष्य धक्के; मोठा आवाज झाल्याची स्थानिकांची माहिती
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात रात्री ८ वाजून ५० मिनीटाच्या सुमारास भूकंप सदृश्य धक्के जाणवले. सह्याद्री पट्ट्यातील सांगेली सह
माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
मोठा आवाज होऊन जमीन हादरली. त्यामुळे तो भूकंपाचा सौम्य धक्का असावा, असा दावा सांगेली सरपंच लवू भिंगारे यांनी केला आहे. दरम्यान याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आपण खात्री करतो, असे त्यांनी सांगितले. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उशिरापर्यंत प्राप्त झाली नाही.
सुमारे तीन वर्षांपूर्वी असाच काहीसा धक्का सावंतवाडी शहरासह या परिसरात बसला होता. यावेळी माडखोल सह दाणोली, सातोळी, बावळट, अगदी बांद्यापर्यंत जमीन हादरल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले होते. मात्र, असाच काहीसा प्रकार आज पुन्हा झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, हा भूकंप असल्याचे अधिकृत रित्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले नसून हा एखादा खनिज पट्टयातील स्फोटाचा प्रकार असू शकतो अशी चर्चाही सुरू होती.