– मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर
मालवण
शासनाने कोरोना काळात विकासकामांवर घातलेली बंदी उठवण्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार आणि पालकमंत्री अपयशी ठरले असुन जिल्ह्यातील जनतेला अजुनही काही महिने खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागणार आहे.आमदार वैभव नाईक मालवण धामापुर ते कुडाळ रस्त्याची वर्कऑर्डर झाली असुन लवकरच रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगत आहेत परंतु सदर काम हे अजुनही निविदा उघडण्याच्या प्रक्रियेत अडकले आहे.तर खासदार राहत असलेल्या गावातील सुकळवाड ते तळगाव रस्ताही निविदा उघडण्याच्या प्रक्रियेत आहे. म्हणजेच खासदार स्वत: च्या गावातील रस्ता होण्यासाठी असलेली बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. पालकमंत्री तर पर्यटक असल्यासारखे जिल्ह्यात येतात.रत्नागिरीतच अडकून असतात. अशा शिवसेनेच्या निष्क्रिय,अपयशी लोकप्रतिनिधींना आता जनतेनेच जाब विचारावा, असे आवाहन मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर जिल्ह्यातील जनतेला प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
बंदी घातलेल्या विकासकामांमध्ये तिलारी पारगड २.२० कोटी, कोल्हापूर नागनवाडी चंदगड रामघाट ते दोडामार्ग अस्नोडा २.११ कोटी, भेडशी बोडदे ते कर्नाटक हद्द २.१३ कोटी, कुडाळ वालावल ते भोगवे २.२० कोटी, पिंगुळी ते श्रीरामवाडी कोचरे बंदर २.१३ कोटी, सावंतवाडीतील कनेडी कडावल ते शिरशिंगे कलंबिस्त २.१३ कोटी, वालावल मारुती मंदिर ते मुणगी केळुस व दाभोली तेंडोली ते माड्याची वाडी १.९४ कोटी, पावशी, तुळसुली, घावनळे, आंबेरी, कुणकेरी ते माणगाव २.२९ कोटी, वेंगुर्ला तुळस ते सावंतवाडी २.३१ कोटी, आडेली वजराठ मातोंड ते आजगाव २.०४ कोटी, आकेरी आंबेरी ते वाडोस २.०६ कोटी, कुडाळ दाभोली तेंडोली ते माड्याची वाडी १.३१ कोटी, चौके धामापुर ते कुडाळ ३.२५ कोटी, सुकळवाड ते तळगाव बावरस्ता १.२५ कोटी, बोर्डी न्हावा शेवा विजयदुर्ग आचरा मालवण ते वेंगुर्ला १.७१ कोटी, ओझर कांदळगाव मसुरे बांदिवडे ते आडवली १.९६ कोटी, झाराप आकेरी ते दोडामार्ग माटणे आयी ३.५६ कोटी, तिलारी घोडगेवाडी मोर्ले ते केरतेरवण २.०७ कोटी,मालवण ते बेळणा २.४९ कोटी, मालवण वायरी ते देवबाग रस्ता १.३५ कोटी अशासुमारे ४२.५० कोटींच्या नुसत्या रस्ता कामांचा समावेश आहे.
शासनाकडे अश्या विकासकामांवर घातलेली बंदी उठवण्याकडे पाठपुरावा न करता राज्यासाठी शासनाने अन्य गोष्टीवरील घातलेली बंदी उठवण्याबाबतच्या निर्णयाचे श्रेय स्वत: घेत आहेत. माझ्यामुळेच बंदी उठवली असे लोकांना भासवत आहेत. मालवणातील जलक्रीडा खेळांवर घातलेली बंदी अजुनही या निष्क्रिय लोकप्रतिनिधींना उठवता आली नाही.
या जलक्रीडाव्यावसायिकांना नुसती खोटी आश्वासने देत आहेत. मुळात शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळेच विकासकामांवर बंदी घातलेली आहे. शासनाकडून विकास कामांसाठी निधी खेचून आणण्याची धमक या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये नाही. फक्त मंत्र्यांबरोबर फोटो सेशन करणे एवढाच एककलमी कार्यक्रम करत असल्याची टीकाही मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.