You are currently viewing सिंधुदुर्ग बँकेच्या ग्राहक सेवा समितीवर आठ जणांची नियुक्ती…

सिंधुदुर्ग बँकेच्या ग्राहक सेवा समितीवर आठ जणांची नियुक्ती…

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहक सेवा व ग्राहक बँकर्स समितीची स्थापना केली असून या समितीवर सतीश लळीत, प्रेमानंद देसाई यांच्यासह आठजणांची नियुक्ती केली आहे. नाबार्डच्या शिफारसीनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
बँकेकडून ग्राहकांना मिळणाऱ्या सेवासुविधा, ग्राहकांच्या तक्रारी, बँकेचे ठेव धोरण याबाबत ही समिती चर्चा करून निर्णय घेईल. तसेच बँकेमध्ये प्रचलित असलेल्या ग्राहकसेवे बाबतच्या कार्यपद्धतींचे पुनरावलोकन करून त्यात आवश्यक त्या सुधारणा सुचवेल. या समितीवर एकूण १५ सदस्य असून त्यापैकी सातजण बँकेचे सरव्यवस्थापक दर्जाचे अधिकारी आहेत. समितीचे अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे असतील. समितीवरील अन्य आठ सदस्यांमध्ये ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’चे अध्यक्ष सतीश लळीत, केर (दोडामार्ग) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रेमानंद देसाई, हेमंत बागवे (ओरोस), विजय आंदुर्लेकर (वेंगुर्ले), प्रसाद वर्णे (सावंतवाडी), बाबली राऊळ (सांगेली), रवींद्रनाथ पावसकर (कट्टा) आणि प्रमोद गावडे (कुडाळ) यांचा समावेश आहे.
या समितीवर दिवाकर देसाई, सरव्यवस्थापक (लेखा), पुरुषोत्तम सामंत, सरव्यवस्थापक (प्रशासन), दीपक पडेलकर, सरव्यवस्थापक (लेखापरीक्षण), कोंडू वरक, सरव्यवस्थापक (कर्जे), देवानंद लोकेगावकर, सरव्यवस्थापक (क्षेत्र वसुली), नितीन सावंत, सरव्यवस्थापक (झेप) बँकेच्यावतीने काम पाहणार आहेत.
या समितीची पहिली सभा नुकतीच बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी हे या पहिल्या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. श्री. दळवी यांनी बँकेच्या ग्राहक सेवा धोरणाची सविस्तर माहिती देऊन यासंदर्भात भविष्यात हाती घ्यावयाच्या नवीन उपक्रमांची माहिती दिली. या बैठकीत सदस्यांनी जिल्हा बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांबाबत चर्चा करून त्यात आवश्यक असलेल्या सुधारणा सुचविल्या. या समितीची बैठक दर तीन महिन्यांनी होणार आहे. ग्राहकांना जिल्हा बँकेच्या ग्राहक सेवा संदर्भात काही तक्रारी असतील किंवा सुधारणा सुचवायच्या असतील तर आपल्या परिसरातील जिल्हा बँक शाखेशी किंवा मुख्य कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा