माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर यांच्या पाठपुराव्याला यश
कुडाळ
कळसुली दिंडवणेवाडी धरणाच्या पाण्यामुळे मठ-कुडाळ -पणदूर-घोडगे हा मार्ग मागील ६ ते ७ दिवस बंद होता. हा मार्ग आजपासून खुला झाला असून सुरळीत सुरू आहे.
हा मार्ग बंद झाल्यामुळे दशक्रोशीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक तसेच कामानिमित्त येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होत होती. सदर रस्ता बंद झाल्यामुळे घोडगे सोनवडे तर्फ कळसुली, भरणी, जांभवडे, कुपवडे या अतिदुर्गम भागातून कुडाळ, पणदूर येथे शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचे तसेच कुडाळ येथे प्रशासकीय कामासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांचे नुकसान होत होते.
त्यामुळे धरणाचे पाणी अडवणाऱ्या संबंधितावर कारवाई करून सदरचा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करावा अशी मागणी माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी काल जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.
याबाबत आज सकाळी कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांनी या भागात भेट देत कळसुली दिंडवणेवाडी धरणाचा गेट मोठा करून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करण्याचे तत्काळ आदेश दिले. यामुळे जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
तसेच दशक्रोशीतील नागरिकांनी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी घेतलेल्या पुढाकाराबाबत आभार मानले आहेत.