*देशात एकाच वेळी तब्बल सव्वा लाख किसान समृद्धी केंद्रांचे २७ जुलैला पंतप्रधानांच्या शुभहस्ते उद्घाटन*
*महाराष्ट्रात सुरू होणार १४,४२९ किसान समृद्धी केंद्रे!*
उद्या २७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात एक लाख पंचवीस हजार “पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र” सुरू होत आहेत. राजस्थानमधून पंतप्रधान या योजनेचा शुभारंभ करत आहेत.
किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत, खत आणि औषधांसाठी देण्यात आलेले अभूतपूर्व अनुदान, पंतप्रधान प्रणाम योजनेतून शेती आणि माती रक्षणासाठी घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय यानंतर “पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रां”चा निर्णय शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवून आणत असल्याची चर्चा होत आहे.
*काय आहेत ही शेतकरी समृद्धी केंद्रे?*
पीएम किसान समृद्धी केंद्रांचे शेतकऱ्यांना अनेक फायदे आहेत. शेतकरी एकाच छताखाली बी-बियाणे, खते खरेदी करू शकतात. माती परीक्षण आणि इतर सुविधाही शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत
पीएम किसान समृद्धी केंद्रातून एकाच छताखाली अनेक सुविधा उपलब्ध होतील. शेती म्हंटली म्हणजे खते, माती, बियाणे, औषधे आलीच. अनेकदा ती महागड्या किमतीत उपलब्ध होतात. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळत नाही. त्यात शेतकऱ्यांची अनेकवेळा फसवणूक होते. योग्य मार्गदर्शन मिळत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या विचारात घेऊन त्यांची स्थिती सुधारावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पीएम किसान समृद्धी केंद्राची भेट दिली आहे.
वन नेशन वन फर्टिलायझर योजनेंतर्गत खते, खत, बियाणे, कीटकनाशकांसह अनेक प्रकारची शेती उपकरणे यंत्रसामग्रीही या केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनाही यंत्रसामग्री भाड्याने घेता येणार आहे. येथून शेतकरी भारत ब्रँडचे खत (वन नेशन वन खत योजना) सहज खरेदी करू शकतील. शेतकरी माती परीक्षण करून घेऊ शकतात. याशिवाय १५ दिवसांत शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी मोहीमही राबविण्यात येणार आहे. मंडईभोवती केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे या केंद्रांवर शेतकऱ्यांचा प्रवेश अधिक सुलभ होणार आहे. ही केंद्रे सुरू करण्यामागचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीबाबत जागरुक करून शेतीसाठी लागणारी यंत्रे, बियाणे इत्यादी चांगल्या दरात उपलब्ध करून देणे हा आहे. या केंद्रांच्या मदतीने शेतकऱ्यांचे प्रश्न एकाच छताखाली सोडवले जातील. देशातील खतांच्या दुकानांवर उत्पादक कंपन्यांकडून डीलरमार्फत खत उपलब्ध करून दिले जाते. यात अनेकदा वेळ जातो. परंतु येथे उत्पादक कंपनी थेट समृद्धी केंद्रांशी जोडली जाईल आणि स्वस्त दरात कृषिसेवा प्रदान करण्यास सक्षम असेल. केंद्र सरकार नव्या किसान समृद्धी केंद्रात सुविधांची व्याप्ती वाढवणार आहे. या केंद्रांना भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना खतांच्या अपघात विम्याचाही लाभ मिळणार आहे. इफकोकडून खतांच्या गोणीवर ४००० रुपयांचा अपघाती विमा दिला जातो. त्यासाठी खत खरेदी केल्यानंतर ग्राहकाला पॉक्स मशिनचे पक्के बिल घ्यावे लागते. याशिवाय शेतीशी संबंधित घटनांसाठी अपघात विम्याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते.
*सव्वा लाख किसान समृद्धी केंद्राच्या शुभारंभाची पार्श्वभूमी*
२२ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून “पी.एम. किसान योजनेंतर्गत” ६०० किसान समृद्धी केंद्रे सुरू करण्यात आली होती. खते, औषधे, बि- बियाणी, आधुनिक परिक्षण उपकरणे व अन्य माहिती शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी विनाकष्ट उपलब्ध व्हावी यादृष्टीने करण्यात आलेला तो प्रयोग होता. यातून अतिशय सकारात्मक परिणाम हाती आल्यानंतर पंतप्रधानांनी त्यावेळी घोषणा केली होती की लवकरच अशी किमान एक लाख केंद्र शेतकऱ्यांच्या सेवेसाठी देण्यात येतील. ती घोषणा अवघ्या काही महिन्यातच वास्तवात उतरत येत्या २७ जुलैला देशभरात एक लाख पंचवीस हजार किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या शुभहस्ते होत आहे.
*शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व समृध्दीसाठी “पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र”*
२७ जुलै रोजी ज्या सव्वा लाख किसान समृध्दी केंद्राचा शुभारंभ पंतप्रधान मोदी करत आहेत, त्यातील प्रत्येक केंद्र हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे व्यासपीठ असेल. महाराष्ट्रात त्यातील १४, ४२९ केंद्रे सुरू होत आहेत. यातून शेतकऱ्यांचे केवळ उत्पन्न वाढवण्याचा हेतू नाही, तर शेतकऱ्याचा दृष्टिकोन विशाल आणि वैज्ञानिक करणारे हे केंद्र असेल. शेतकऱ्यांना वैज्ञानिक दृष्टीने यात मार्गदर्शन मिळत राहील. शेतातील अडचणी, आधुनिकीकरण याबाबत शेतकरी आणि कृषिशास्त्रज्ञ एकमेकांशी जोडलेले राहतील. किसान समृद्धी केंद्र आणि कृषी विकास केंद्र ही दोन्ही यामध्ये एकमेकांशी जोडलेली राहतील. तसेच अग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आणि कृषि संशोधन केंद्राशी हे किसान समृद्धी केंद्र जोडलेले राहील.
या केंद्रावर शेतकऱ्यांना फक्त खते व औषधेच मिळतील असे नाही, तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या पिकावर आलेल्या कोणत्याही आजारावर मार्गदर्शन मिळेल, आधुनिक लिफ-लॅब द्वारे पिकाचे परीक्षण करून घेण्याची सोय असेल, लॅबोरेटरीत त्याच्या कृषी उत्पादनाचे परीक्षण आणि कोणती रोगप्रतिकारक औषधे वापरली पाहिजेत याचे नेमकेपणाने मार्गदर्शन तिथे होईल. माती परीक्षण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी त्याची मशिनरी याठिकाणी असणार आहे. एवढेच नव्हे, तर सीएससी सेंटरची सुविधा इथे असेल, ज्यात कृषीविषयक सरकारी योजनेची माहिती देत लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन ते योजनेचा फॉर्म भरण्यापर्यंतची सर्व मदत केली जाईल. साहजिकच, शेतकरी हा सरकारी योजनांचा लाभही घेऊ शकतो आणि सध्या घेत असलेल्या पिकांमध्ये सुधारणाही करून आर्थिक उन्नती साधू शकतो.
भविष्यात किसान समृद्धी केंद्र हे एक असे व्यासपीठ बनेल, जिथे आपण कृषी विषयक कोणताही कार्यक्रम घेऊ शकतो. ज्याठिकाणी बसून कोणताही शेतकरी कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवू शकतो. एवढेच नव्हे तर कृषिमंत्र्यांना किंवा फर्टीलायझर मंत्रालयाला शेतकरी ज्या काही सूचना करू इच्छित असेल त्या थेट या केंद्राद्वारे करण्याची सुविधा देण्यात येईल. अगदी पंतप्रधानांनाही संपर्क करण्याची व्यवस्थाही असेल. देशाच्या पंतप्रधानांना थेट शेतकऱ्यांशी जोडण्यासाठीचा हा देशातील अभिनव प्रयोग म्हणता येईल. म्हणूनच आपल्या सहभागातून जवळच्या किसान समृद्धी केंद्राला सक्षम बनवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत.