You are currently viewing विद्यार्थी उत्कर्ष मंडळाला सर्वतोपरीने मदत करणार – मंगलप्रभात लोढा

विद्यार्थी उत्कर्ष मंडळाला सर्वतोपरीने मदत करणार – मंगलप्रभात लोढा

*सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांची प्रमुख उपस्थिती*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

गेली ६९ वर्षे मध्य मुंबईत विद्यार्थ्यांसाठी कार्य करीत असलेल्या ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळास’ भविष्यात शासनाकडून काही मदत लागल्यास मी ती सर्वतोपरीने करीन, असे आश्वासन कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. मंडळाच्या चिंचपोकळी, सातरस्ता, भायखळा, ना. म. जोशी मार्ग आणि लालबाग या पाच विभागात स्वतःच्या मालकीच्या अभ्यासिकेची गरज आहे, त्या संदर्भात आपण प्रयत्न करू असे ही मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागामार्फत भायखळा पूर्व येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम गेली चार पिढ्यांच्या माध्यमातून विद्यार्थी उत्कर्ष मंडळ गिरणगावात करीत असून, हे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी काढले. संस्थेचे काम खूप मोठे असून मला सुद्धा या संस्थेबरोबर काम करायला आवडेल अशी इच्छा ही त्यांनी यावेळी दर्शवली. याप्रसंगी शालांत परीक्षेत मंडळातून सर्वप्रथम आलेल्या शंतनू पावसकर तसेच शैक्षणिक, कला, क्रीडा पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांचा गौरव तसेच प्रणाम हस्तलिखित, शारदास्मृती या जाहिरात अंकाचे आणि विवेकानंद स्मृती या जाहिरात अंकाच्या दर पत्रकाचे प्रकाशन फुलवा खामकर यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे माजी मंडळप्रमुख कै. सुरेश वारीक, कै. मधुकर भोसले, कै. बाळू वाळके आणि कै. नरेंद्र शानभाग यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्त स्मरण करून त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार फुलवा खामकर यांच्या हस्ते करण्यात आला. मंडळाचे सभासद भिसाजी सुर्वे यांना डॉक्टरेट मिळाल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळप्रमुख सागर बोने, मान्यवरांचा परिचय स्वप्नील हराळे, गीत सुवर्णा क्षेमकल्याणी, बोधपटाचे वाचन कौशल राणे तर आभार शार्दुल केळंबेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा