*कैवल्यधामद्वारे योगावरील शास्त्रीय माहितीपट प्रकाशित*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
योगविद्येचे प्रशिक्षण देणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कैवल्यधाम संस्थेने आपले शतक महोत्सवी वर्ष साजरे करत असताना “योगिक विज्ञान” नावाचा माहितीपट जगासमोर ठेवण्याची घोषणा केली आहे.
सदर माहितीपटात, योग हे शास्त्र आहे का? योगामागील विज्ञानाचा अभ्यास करून, योगाला सर्वसमावेशक पद्धतीने सर्वसामान्यांत रुजवणे, हाच या माहितीपटाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये गेल्या १०० वर्षांतील योगामधील उत्क्रांती दर्शविली असून वैज्ञानिक प्रयोगद्वारे प्रमाणीकरण करून योगाबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठी आवश्यक बाबींचा सप्रमाण समावेश केला आहे.
या माहितीपटाचे अधिकृत प्रकाशन एन. सी. पी. ए., मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सन्मानीय अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री, कैवल्यधाम शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष आणि ऋषिहूड विद्यापीठाचे कुलपती सुरेश प्रभू यांची विशेष उपस्थिती होती.
गेल्या शतकभरात कैवल्यधामने योगाच्या क्षेत्रात केलेले महत्त्वपूर्ण कार्य देखील सदर माहितीपटामध्ये दाखविण्यात आले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये महाराष्ट्रातील लोणावळा येथे वसलेल्या या संस्थेच्या उत्क्रांतीची मंत्रमुग्ध करणारी कहाणी यात पहायला मिळते.
योगामध्ये वैज्ञानिक पातळीवर संशोधन करणारी आणि जगातील पहिले योग महाविद्यालय स्थापन करणारी एकमेव संस्था होण्याचा मान लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेला मिळाला आहे. कैवल्यधामने त्यांच्या संपूर्ण इतिहासात वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे शुद्ध पारंपारिक स्वरूपात योगाचा प्रसार केला आहे.
माहितीपटाच्या केंद्रस्थानी कैवल्यधामाचे संस्थापक स्वामी कुवलयानंद यांचे अधिष्ठान आहे, ज्यांना प्रेमाने “योगी वैज्ञानिक” म्हणून ओळखले जाते. स्वामी कुवलयानंद यांनीच योग चिकित्सा जगासमोर आणून योग क्षेत्रात क्रांती घडवून आणली तसेच योगाचे उपचारात्मक फायदे लोकांसमोर आणले. अनेक वर्षांपासून कैवल्यधाम कॅन्सर केअर, जीन थेरपी, ऑटो-इम्यून डिसऑर्डर आणि त्याही पलीकडे अनेक रोगांच्या उपचारासाठी योगाचा उपयोग त्यांच्या वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध केलेल्या भक्कम अशा संशोधनांसह यशस्वीपणे करत आहे.
यावेळी बोलताना कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी म्हणाले, “हा माहितीपट संशोधन आणि शिक्षणाच्या सीमा ओलांडत योगाची सत्यता टिकवून ठेवण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही संस्थेचा शतक महोत्सवी टप्पा पार करत असताना, जगभरातील साधकांना आमच्या या सिनेमॅटिक एक्सप्लोरेशनमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करतो. या समृद्ध वारशाचा आणि योगाचा प्रत्येक व्यक्ती आणि संपूर्ण समाजावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.”
संस्थेचा समृद्ध वारसा जपताना, योगक्षेत्रातील त्याचे सखोल योगदान आणि मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात होत असलेला महत्त्वपूर्ण प्रयत्न याविषयी माहितीपट दर्शकांना आकर्षक प्रवासात घेऊन जातो. दरवर्षी, कैवल्यधामद्वारे जगभरातील १०००० हून अधिक व्यक्ती जीवनात सकारात्मक बदल होऊन प्रभावित होतात. संस्थेचे हितचिंतक असलेल्या काही प्रमुख व्यक्तींमध्ये महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जे.आर.डी.टाटा यांचा समावेश आहे.
खालील लिंकवरून तुम्ही डॉक्युमेंटरी पाहू शकता https://youtu.be/QJEvRf1v69A